Kokan Travel News: कोकणवासीयांसाठी फडणवीस सरकारचं खास ‘शिमगा गिफ्ट’; विजयदुर्गापर्यंत फक्त सात तासांत बोटीने सफर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा समुद्रमार्गे अवघ्या सात तासांत प्रवास शक्य होणार असून कोकणवासीयांसाठी हा जलप्रवास मोठा दिलासा ठरणार आहे.

Kokan Travel News: कोकणवासीयांसाठी फडणवीस सरकारचं खास ‘शिमगा गिफ्ट’; विजयदुर्गापर्यंत फक्त सात तासांत बोटीने सफर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: ‘कोकणचा शिमगा’ म्हटलं की मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. लाल मातीची ओढ आणि ग्रामदेवतेच्या पालखीची आस प्रत्येक कोकणवासीयाला गावी बोलावत असते. मात्र गावी जाण्याचे वेध लागले की डोळ्यांसमोर उभी राहते ती रेल्वेची प्रचंड वेटिंग लिस्ट, एसटी बसमधील प्रचंड गर्दी आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या न संपणाऱ्या रांगा. दरवर्षीचा हा प्रवासाचा ‘वनवास’ पार करत मजल-दरमजल करत कोकणवासी कसेबसे गावी पोहोचतात. पण यंदा मात्र या प्रवासातील अडथळ्यांच्या ‘शिमग्या’ला पूर्णविराम मिळणार असून कोकणवासीयांचा खऱ्या अर्थाने ‘आनंदाचा शिमगा’ साजरा होणार आहे.

प्रवाशांची दरवर्षी होणारी गैरसोय आणि हालअपेष्टा लक्षात घेऊन राज्य सरकारने कोकणवासीयांसाठी खास ‘होळी गिफ्ट’ जाहीर केले आहे. आता धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याऐवजी थेट निळ्याशार समुद्राच्या लाटांवर स्वार होत दिमाखात गावी जाता येणार आहे. येत्या 1 मार्चपासून मुंबई ते तळकोकण असा स्वप्नवत जलप्रवास सुरू होत असून ‘एम टू एम’ (M2M) फेरी सेवेमुळे हा प्रवास प्रत्यक्षात उतरणार आहे. या घोषणेमुळे मुंबईतील कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Maharshtra Weather Update: निसर्गाचा लहरी खेळ! थंडीची पाठ अन् पावसाशी गाठ; महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे सावट

राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या बहुप्रतिक्षित जलवाहतूक सेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, 1 मार्च रोजी सुरू होणाऱ्या या फेरी सेवेत मंत्री नितेश राणे स्वतः प्रवाशांसोबत प्रवास करत या ऐतिहासिक उपक्रमाचे साक्षीदार होणार आहेत. रस्तेमार्गे गावी पोहोचण्यासाठी लागणारा 12 ते 15 तासांचा थकवणारा प्रवास आता समुद्रमार्गे अवघ्या सात तासांत पूर्ण होणार आहे. भाऊचा धक्का येथून सुटणारी ही फेरी थेट ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने कोकण किनाऱ्यावर पोहोचणार आहे.

शिमगोत्सवानिमित्त या फेरी सेवेचे वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीने निश्चित करण्यात आले आहे. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 1 मार्च, 4 मार्च आणि 7 मार्च रोजी सकाळी आठ वाजता भाऊचा धक्का येथून फेरी सुटेल आणि दुपारी तीन वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सुरू होणारा हा समुद्रप्रवास दुपारी कोकणच्या लाल मातीत विसावणार आहे.

शिमग्याचा सण उत्साहात साजरा करून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासाचीही तितकीच सक्षम व्यवस्था करण्यात आली आहे. 2 मार्च, 5 मार्च आणि 8 मार्च रोजी विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल आणि सायंकाळी सात वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल. त्यामुळे परतीचा प्रवासही जलद, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

‘शिमगा आणि चाकरमानी’ हे कोकणातील भावनिक नाते मानले जाते. नव्या जलवाहतूक सुविधेमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याबरोबरच कोकण पर्यटनालाही नवी चालना मिळणार आहे. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यांचा स्पर्श अनुभवत, निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवत गावी जाण्याचा हा प्रवास कोकणवासीयांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. यंदाचा शिमगा ‘पाण्यावरून गावची वाट’ धरत कोकणवासीयांसाठी अविस्मरणीय ठरणार, यात तिळमात्र शंका नाही.

हेही वाचा: Donald Trump: 'भारतासोबतचा व्यापार करार…';अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number