Friday, February 13, 2026 09:50:31 AM

Mumbai University Exams : निवडणुकांचा फटका; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या तारखा बदलल्या असल्या तरी इतर तांत्रिक बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

mumbai university exams  निवडणुकांचा फटका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या जाणून घ्या नवीन वेळापत्रक

मुंबई: शैक्षणिक वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा आणि राज्याच्या राजकीय पटलावर उमटलेले पडसाद यामुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. येत्या 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध शाखांच्या परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ऐन परीक्षेच्या काळात वेळापत्रकात हा बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी विद्यापीठाने तातडीने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

निवडणुकीची धामधूम आणि त्यातच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, या दोन्ही गोष्टींचा थेट परिणाम विद्यापीठाच्या नियोजनावर झाला आहे. शासकीय दुखवटा आणि बदललेली निवडणूक प्रक्रिया यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला होता. परिणामी, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने 9 आणि 10 फेब्रुवारीचे पेपर आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या तारखा बदलल्या असल्या तरी इतर तांत्रिक बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जे पेपर ज्या वेळेत आणि ज्या केंद्रांवर नियोजित होते, ते त्याच वेळेनुसार 24 आणि 25 तारखेला पार पडतील. केवळ तारखेचा आकडा बदलला असून, परीक्षा केंद्रावरील नियोजनात कोणताही बदल नसल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयांनी ही माहिती तातडीने विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Rashmika - Vijay : रश्मिका - विजय यांचं लग्न आज?; पाहा तयारीचा व्हायरल व्हिडिओ

वास्तविक, या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 जानेवारीला मतमोजणी होणार होती. परंतु, 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली. जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे सर्व सार्वजनिक उपक्रम आणि शैक्षणिक कामकाज स्थगित करण्यात आले होते. या घटनेमुळे निवडणूक आयोगालाही कार्यक्रम पुढे बदलावा लागला आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई विद्यापीठालाही नियोजित परीक्षेचा मुहूर्त बदलावा लागला आहे.

विशेष म्हणजे, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना यंदा वारंवार लांबणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणारे पेपर 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान ढकलण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा निवडणूक आयोगाच्या नव्या वेळापत्रकामुळे ते पेपर 17, 18 आणि 20 फेब्रुवारीला होणार आहेत. तसेच, 28 जानेवारीच्या दुपारच्या सत्रातील रद्द झालेली परीक्षा आता 3 फेब्रुवारीला दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत घेतली जाणार आहे.

वारंवार बदलणाऱ्या या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तारीख पे तारीख अशी भावना निर्माण झाली असली, तरी परीक्षेच्या अंतिम टप्प्यात कोणत्याही प्रकारची ओढाताण होऊ नये, हाच विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची अधिकृत प्रत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावी, जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येईल.

हेही वाचा: Iran America War: इराण-अमेरिका युद्धाचा भडका उडणार? खामेनींचा ट्रम्प यांना थेट इशारा, म्हणाले 'कुणी त्रास दिला तर त्याला...'


सम्बन्धित सामग्री