Mumbai Local Train Megablock: वर्षाचा शेवटचा रविवार प्रवासात जाणार? कांदिवली-बोरिवली दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक, असा होईल परिणाम

पश्चिम रेल्वेवर कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

Mumbai Local Train Megablock: वर्षाचा शेवटचा रविवार प्रवासात जाणार? कांदिवली-बोरिवली दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक, असा होईल परिणाम

मुंबई: वर्षाच्या शेवटच्या रविवारी सहकुटुंब बाहेर पडण्याच्या विचारात असलेल्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे आज (रविवार) आणि उद्या (सोमवार) अशा दोन दिवसांत एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पातील शेवटचा टप्पा असलेल्या कांदिवली ते बोरिवली दरम्यानच्या 3.7 किमी मार्गावर रुळ टाकणे आणि तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी 21डिसेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत आहे. यानुसार, आज रविवारी सुमारे 235 फेऱ्या (120 अप आणि 115 डाऊन) रद्द राहतील, तर सोमवारी 98 फेऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.

हेही वाचा: U19 World Cup 2026 : 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; 'या' खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा

हार्बर मार्गावरील प्रवाशांचीही गैरसोय

केवळ मुख्य मार्गच नव्हे, तर हार्बर रेल्वेच्या प्रवाशांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे. बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक आठ आणि नऊ प्रवासी वापरासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने, बोरिवली आणि अंधेरीतून सुटणाऱ्या हार्बर लोकल केवळ गोरेगावपर्यंतच जातील. याशिवाय डहाणू रोड-बोरिवली मेमू आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला असून, काही गाड्यांचे थांबे बदलण्यात आले आहेत.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे महत्त्व

पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानिक लोकल एकाच मार्गावर येत असल्याने वेळापत्रकाचा बोजवारा उडतो. ही अडचण दूर करण्यासाठी स्वतंत्र पाचवी आणि सहावी मार्गिका उभारली जात आहे. मात्र, माहीम ते खार दरम्यान असलेल्या अतिक्रमणांमुळे या प्रकल्पाला विलंब होत आहे.

तरीही, कांदिवली-बोरिवली दरम्यानचे काम पूर्ण झाल्यास भविष्यात प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; 207 जागांवर शिक्कामोर्तब; कोण किती जागा लढवणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number