विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चिंचाळा येथे रक्ताच्या नात्यात असलेल्या चुलत पुतण्यांनीच चोरटे आल्याचा बनाव करत विहीरीकडे नेऊन जमिनीच्या वादातून 65 वर्षीय चुलत्याचा कोयत्याने मुंडके धडावेगळे छाटून खून करून मृतदेह विहीरीत फेकल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ दिवसानंतर मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. हे कृत्य "क्राईम पेट्रोल" मालिका पाहूनच सुचल्याचे आरोपीने सांगितले.
65 वर्षीय नामदेव एकनाथ ब्रम्हराक्षस बीड जिल्ह्यातील गेवराई येथे कनिष्ठ न्यायालयातून लिपीक म्हणून सेवानिवृत झाले होते. त्यांची चिंचाळा (ता.पैठण) शिवारात जमिन गट क्र.121 मध्ये 57 गुंठे जमिन असून ते सेवानिवृत्तीनंतर गावाकडे शेतात घर बांधायचे म्हणून पत्नीसमवेत मंगळवारी 6 मे रोजी आपल्या गावी भावाकडे आले होते. दोन दिवस त्यांनी घर बांधण्याची जागा नक्की करून परत छ. संभाजीनगरला जाण्याचा ठरवले. मात्र शुक्रवारी 9 मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचा खून करून प्रेत त्यांच्याच विहीरीत टाकून देण्यात आले होते. सकाळी भाऊ व त्यांची पत्नी झोपेतून उठल्यानंतर त्यांना नामदेव बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्यावेळी भाऊ व पत्नीने नामदेव ब्रम्हराक्षस याचा शोध घेतला असता त्यांना स्वतःच्या शेतातील विहिरीत मुंडके विरहीत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसला. पाणी उपासल्यानंतर उशिरा मुंडके विहीरीच्या तळाशी सापडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताचा मुलगा राहूल ब्रम्हराक्षस याच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी तातडीने संबंधीत घटनेचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते. या घटनेनंतर आठ दिवसापासून गुन्हे शाखेचे पोलिस घटनेचा शोध घेत होते. त्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन बारकाईने तपास केला असता मृताच्या नात्यातीलच चुलत पुतण्यांनी हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
हेही वाचा: नागपुरात क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल; टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश
बाबासाहेब ब्रम्हराक्षस व आबासाहेब ब्रम्हराक्षस अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत. मयत नामदेव ब्रम्हराक्षस यांनी आरोपीचे वडील सखाराम ब्रम्हराक्षस याचेकडून काही वर्षापूर्वी दीड एकर जमीन खरेदी केली होती. सखाराम व त्याच्या मुलाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांनी नामदेव यांना सदर जमिन परत देण्याची मागणी केली. मात्र मयत नामदेव एक दिवस खरेदी केलेली जमिन नांगरत असताना संबंधित ट्रॅक्टर चालकाने आरोपीस सदर जमिन 15 गुंठे जास्तीची असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीनी मृत नामदेव यांच्याकडे मोबदला घ्या व पूर्ण जमीन द्या म्हणून मागणी लावून धरली. परंतु नामदेव हे जमिन देत नसल्याने त्यांच्या मनात चिड निर्माण झाली. त्यातच नामदेव हे सेवानिवृत्तीनंतर जमिनीवर घर बांधून कायमचे राहायाला येणार हे पाहून बाबासाहेब व आबासाहेब यांना राग आला. त्यांनी "क्राईम पेट्रोल" मालिकेमधील घटना आठवली व त्यांनी मयत नामदेव हे शेतात भावाकडेच मुक्कामास असल्याचे पाहून शुक्रवारी 9 मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरटे आले, 'काका तुम्ही चला' असे म्हणून त्यांना झोपेतून उठवून विहीरीकडे नेले व एकाने त्यांचा दोन्ही हाताने गळा आवळला तर दुसऱ्याने कोयत्याने मुंडके धडावेगळे करून प्रेत त्यांच्याच विहीरीत टाकले असल्याची अंगावर शहारे आणणारी धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी बाबासाहेब ब्रम्हराक्षस व आबासाहेब ब्रम्हराक्षस या दोघा भावांना अटक केले आणि न्यायालयाने 21 मेपर्यंत दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलिस करत आहेत.