Monday, June 23, 2025 12:40:25 PM

‘मी काही बोलले तर कुटुंबाला मारण्याची...' भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर भावजईचा गंभीर आरोप

प्रिया फुके यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर धमकी, संपत्तीप्रकरणी अन्याय, पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत महिला नेत्यांनी पाठींबा दर्शवून न्याय मिळावा, मागणी केली.

‘मी काही बोलले तर कुटुंबाला मारण्याची भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर भावजईचा गंभीर आरोप

नागपूर: भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'माझ्यावर दररोज गुंडांमार्फत धमक्या येतात, पोलीस ठाण्यात सतत चकरा माराव्या लागतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदत मागितली, पण 'बघतो, बघतो' या पलीकडे काहीच झाले नाही,' अशी भावना त्यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत मांडली. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेही उपस्थित होत्या.

प्रिया फुके यांनी स्पष्ट केले की, 2012 मध्ये त्यांचे लग्न संकेत फुके यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांच्या पतीला किडनीचा आजार झाला आणि त्याचे प्रत्यारोपणही करण्यात आले. 2022 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर प्रिया फुके यांनी पतीच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारले असता, त्यांना घराबाहेर काढण्यात आले आणि जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. 'मी काही बोलले तर माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली गेली,' असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

प्रिया फुके यांचे म्हणणे आहे की, त्या दोन लहान मुलांसह सध्या आईकडे राहतात. त्या रोज पोलीस ठाण्यात जातात, पण न्याय मिळत नाही. 'पत्रकार परिषदेस येताना माझ्यामागे दोन अनोळखी पुरुष होते. अनेक वेळा गुंड माझ्या घरासमोर आले आहेत. त्यांच्या बॅगांमध्ये जड वस्तू होत्या,' असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'जरांगे पागल माणूस, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये...'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्यावर घणाघात

त्यांनी पुढे म्हटले की, त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 'माझ्यावर अॅट्रोसिटी व खंडणीचे खोटे आरोप लावले गेले. माझ्या मुलांच्या आजी-आजोबांनी कोर्टात कस्टडीसाठी केस दाखल केली आहे. आई जिवंत असताना आजी-आजोबा कस्टडी कशी मागू शकतात?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रिया फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपत्तीबाबतच्या कागदपत्रांसह चार वेळा भेट दिली होती. 'त्यांनी प्रत्येक वेळी 'बघतो, बघतो' असे उत्तर दिले. त्यांनी आजवर कधीही हस्तक्षेप केला नाही. महिला आयोगातही 2024 मध्ये तक्रार केली होती, पण तिथूनही काहीच मदत मिळाली नाही,' असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी पोलिसांवरही टीका केली. 'प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही, मात्र आरोपीने केलेल्या तक्रारीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांची भूमिका ही स्पष्टपणे प्रिया फुके यांच्या विरोधात आहे,' असे त्या म्हणाल्या.
 


सम्बन्धित सामग्री