नाशिक: नामपूर येथे एक धक्कादायक घटना घडली असून, स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि राख गायब झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ चोरीची आहे की अघोरी क्रियेचा भाग, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरेखा दीपक खैरनार (वय 40) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सर्व हिंदू रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांनी अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत भेट दिली असता, अस्थी आणि राख गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा: अकरावीची सराव नोंदणी आजपासून सुरू; कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 55,000 हून अधिक जागा उपलब्ध
हिंदू परंपरेनुसार विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी काही दागिने घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे अनेक वेळा राखेत दागिने सापडतात. याच कारणामुळे काही व्यक्तींनी सोन्याच्या लालसेपोटी ही राख चोरली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, हा प्रकार अघोरी क्रियेचा भाग असण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमी हे ठिकाण टवाळखोर आणि नशा करणाऱ्या तरुणांचे अड्डे बनले आहे. त्यांना हटकले तर ते दादागिरी करतात, अशी तक्रार वारंवार करण्यात आली आहे. यापूर्वीही काही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणामुळे शहरात संतापाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत व्यक्तीही आता सुरक्षित नाही, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत उभारावी आणि नशेखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.