मुंबई : नारायण राणे विरुद्ध प्रकाश महाजन वाद शिगेला पोहोचला आहे. राणेंविरोधात महाजन क्रांती चौकात आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांना राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. यानंतर प्रकाश महाजन यांनी मी छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकात येतो, तुम्हाला काय करायचे ते करून दाखवा असे आव्हान दिले होते. यानंतर पोलीस प्रकाश महाजन यांच्या घरी पोहोचले. प्रकाश महाजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र प्रकाश महाजन हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नारायण राणे यांनी एक्स पोस्ट (X post) केली. यानंतर महाजन चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. राणेंची गुंडगिरी मी खपवून घेणार नाही, राणेंच्या धमकीला मी घाबरत नसून मी साडेदहा वाजता संभाजीनगरच्या क्रांतीचौकात येणार, माझं काय करायचं करा, असा आवाहनच महाजन यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांनी राणेंच्या विरोधात आंदोलन केले.
हेही वाचा : 'कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका'
नारायण राणेंची पोस्ट
टीव्ही-9 च्या मुलाखतीत प्रकाश महाजन यांनी जे अकेलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये. एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिद्ध केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची कुम्ही ठरवणारे कोण? असा सवाल महाजनांनी राणेंना केला. तसेच आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? असाही सवाल नारायण राणे यांनी महाजन यांना केला आहे.
आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही. तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजनांना केला.
दरम्यान राणेंनी केलेल्या पोस्टनंतर महाजन आक्रमक झाले आहेत. राणेंची गुंडगिरी खपवून घेणार नाहीय तसेच राणेंच्या धमकीला घाबरत नसून साडेदहा वाजता संभाजीनगरच्या क्रांती चौकात येणार, माझं काय करायचं करा, असा आवाहनच महाजन यांनी दिलं होतं. संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाजनांनी राणेंविरोधात आंदोलन छेडले.