नाशिकमधील आयटी क्षेत्रात समोर आलेल्या कथित शोषण आणि धर्मांतराच्या आरोपांमुळे निर्माण झालेलं प्रकरण अधिकच गंभीर वळण घेत आहे. या प्रकरणात पीडित तरुणींनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीसमोर मांडलेले अनुभव केवळ धक्कादायकच नव्हे, तर अंतर्मुख करणारे ठरत आहेत. एका तरुणीने सांगितलेली आपबीती तर या संपूर्ण प्रकरणाचं भयावह चित्र उभं करते. “घरी वडील कॅन्सरने अंथरुणाला खिळले होते… औषधांसाठी पैसे नव्हते… घरात खायला काहीच नव्हतं,” असं ती सांगताना भावूक झाली. अशा परिस्थितीत नोकरी टिकवणं तिच्यासाठी गरजेचं होतं आणि याच मजबुरीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तिने केला आहे.
फक्त एकाच नव्हे, तर अनेक तरुणी अशाच अडचणीत सापडल्याचं समोर येत आहे. कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक ताण आणि भविष्यातील भीती या सगळ्यांचा दबाव वापरून काही जणांनी त्यांना जाळ्यात अडकवलं, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एक गुन्हा म्हणून नव्हे, तर संघटित पातळीवर घडलेल्या प्रकाराच्या दृष्टीने पाहिलं जात आहे.या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या विशेष समितीने थेट संबंधित कंपनीच्या कॅम्पसमध्ये भेट दिली. कार्यालयीन व्यवस्था, कामाचं वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या अटी-शर्ती यांची सखोल पाहणी करण्यात आली. तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीचा आढावा घेत समितीने काही मुद्द्यांवर अधिक तपासाची गरज व्यक्त केली आहे.
या प्रकरणातील काही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासासाठी विशेष पथकासोबत इतर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातील सुरक्षितता, विशेषतः महिलांच्या कामाच्या ठिकाणावरील वातावरणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडितांच्या आवाजामुळे हा मुद्दा आता केवळ एका कंपनीपुरता मर्यादित न राहता व्यापक चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील तपासातून आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.