नाशिकच्या कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणारे आणि सामाजिक शांततेला धक्का देणारे 'टीसीएस' (TCS) कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरण आता अत्यंत गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. या प्रकरणाचा मुळापासून तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती काही खळबळजनक पुरावे लागले असून, आरोपींनी आपल्या वासनांध आणि धार्मिक अजेंड्यासाठी अमानवीय मार्गांचा अवलंब केल्याचे उघड झाले आहे. संशयित आरोपींनी केवळ विश्वास संपादन केला नाही, तर पद्धतशीरपणे पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी षडयंत्र रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
SIT च्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी पीडित महिलांना शिरखुर्मा आणि काही थंड पेयांमधून गुंगीकारक पदार्थ मिसळून देत असत. या पदार्थांच्या प्रभावाखाली असलेल्या आणि स्वतःवरचे नियंत्रण गमावलेल्या महिलांवर आरोपींनी वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, या अत्याचारांनंतर पीडित महिलांचे मनपरिवर्तन करून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी आरोपींकडून मानसिक दडपण आणि पद्धतशीर मोहिमेसारखे प्रयत्न केले जात होते, असेही तपासातून स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी प्रवृत्ती नसून, त्यामागे एक मोठे धार्मिक व आर्थिक षडयंत्र असण्याची शक्यता बळावली आहे. तपासादरम्यान आरोपींचे बँक स्टेटमेंट्स आणि KYC कागदपत्रे तपासली असता, तरुणींचे धर्मांतर करण्यासाठी काही संशयास्पद आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचे पुरावे SIT ला आढळले आहेत. हे 'परकीय चलन' नेमके कुठून आले आणि हे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, याचा छडा लावण्यासाठी आता पोलीस आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहेत.
कायदेशीर आघाडीवरही आरोपींना मोठा दणका बसला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मांडलेला धारदार युक्तिवाद आणि SIT ने सादर केलेले ठोस तांत्रिक पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. निदा सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
दुसरीकडे, या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींच्या अडचणींत अधिकच भर पडली आहे. शनिवारी (2 मे 2026) तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन या चार संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ केली आहे. तर आसिफ अन्सारी, शफी शेख आणि कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हे सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने कारागृहात आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत असून, येणाऱ्या काळात या रॅकेटचे आणखी काही सूत्रधार पडद्यासमोर येण्याची शक्यता आहे.