नाशिक रोड परिसरात शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री उशिरा एक हृदयद्रावक रेल्वे अपघात घडला. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारमधील रक्सौलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस या गाडीतून तीन युवक खाली पडल्याची घटना घडली. यापैकी दोन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून, तिसरा युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना नाशिक रोड स्थानक ओलांडल्यानंतर काही अंतरावर ढिकलेनगर परिसरात घडली. ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर पोलिस आणि रेल्वे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार भोळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर किलोमीटर 190/1 ते 190/3 या दरम्यान दोन युवक मृतावस्थेत तर तिसरा युवक गंभीर जखमी अवस्थेत सापडला.
हेही वाचा : Pakistan - Afghanistan Ceasefire : कतारमध्ये निर्णय! पाकिस्तान-अफगाणिस्तान युध्दविरामावर सहमती,जाणून घ्या
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दिवाळी सणामुळे बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी होती. या गर्दीमुळे हे युवक दरवाजाजवळ उभे राहिले असावेत आणि रेल्वे वेगाने जात असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रवास करत होते, याचा तपास सुरू आहे.
धावत्या रेल्वेतून युवक खाली पडल्याचे लक्षात येताच गाडीत गोंधळ उडाला. इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि जवळील साईनाथ नगर भागातील नागरिक घटनास्थळी धावले. रेल्वेचे लोको पायलट के. एम. डेरे यांनी तत्काळ ही माहिती नाशिक रोड रेल्वे उपप्रबंधक कार्यालयाला दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस तसेच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
मृत आणि जखमी तिघांकडे कोणतीही ओळखपत्रे किंवा कागदपत्रे सापडलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमी युवकाला अधिक चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ही दुर्घटना नाशिक रोडजवळील साईनाथ नगर, मारुती मंदिर परिसरात घडल्याचे समोर आले आहे. कर्मभूमी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12546) रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी नाशिक रोड स्थानकावरून सुटल्यानंतर थोड्याच वेळात हा अपघात घडला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने, या घटनेने प्रवास सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या काळात दरवाजाजवळ उभे राहू नये आणि प्रवासादरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन केले आहे. नाशिक रोड पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
हेही वाचा : USA No Kings Protest: अमेरिकेत ‘नो किंग्ज’ आंदोलनाने ट्रम्प प्रशासनाला आव्हान; ५० राज्यांत नागरिक रस्त्यावर