Friday, June 12, 2026 10:47:01 PM

Nashik Acid Attack: नाशिक हादरलं! टेरेसवर झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर अ‍ॅसिड हल्ला; दोघे गंभीर जखमी

नाशिकच्या येवला तालुक्यात झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली.

nashik acid attack नाशिक हादरलं टेरेसवर झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर अ‍ॅसिड हल्ला दोघे गंभीर जखमी

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एका शेतकरी दाम्पत्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवळाणे येथील बोराडे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने झोपेत असलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बोराडे आणि त्यांच्या पत्नी कांता बोराडे हे उष्णतेमुळे नेहमीप्रमाणे घराच्या टेरेसवर झोपले होते. रात्री अचानक कुणीतरी त्यांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकल्याने दोघेही वेदनेने ओरडू लागले. आरडाओरडा ऐकून कुटुंबीय आणि शेजारी धावत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमी दाम्पत्याला तातडीने येवला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली. नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन आणि येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे देखील उपस्थित होते.या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

 


सम्बन्धित सामग्री