Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठं नेतृत्वात्मक आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना पक्षाची जबाबदारी आणि उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. मात्र अजून अजित पवार यांचं दहावंही झालेलं नसताना इतक्या लवकर निर्णय का घेतले जात आहेत, असा प्रश्न आता सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
या घडामोडींवर टीका वाढू लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल पाटील यांनी या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना, ही घाई नसून परिस्थितीची गरज असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या मते, अजित पवार यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पक्ष संघटना दिशाहीन झाल्याची भावना आहे.
अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार आधीच निश्चित झाले होते आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. अशा परिस्थितीत नेतृत्वाचा अभाव पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि संघटनात्मक निर्णय वेळेत घेण्यासाठी नेतृत्व तातडीने निश्चित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
“अजित पवार यांचं जाणं हे पक्षासाठीच नव्हे, तर राज्यासाठी न भरून निघणारं नुकसान आहे. ही पोकळी कुणीही भरू शकत नाही,” असं सांगत पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. मात्र राजकारण थांबत नाही आणि पक्षाची यंत्रणा चालू ठेवणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना होती का, या प्रश्नावरही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनिल पाटील यांनी सावध भूमिका घेत, या विषयावर सध्या चर्चा करण्यात अर्थ नाही, असं सांगितलं आहे.
सोशल मीडियावर आणि जनतेमध्ये व्यक्त होत असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना अनिल पाटील म्हणाले की, दुःखाचा काळ असला तरी पक्षाच्या आमदारांच्या भावना लक्षात घेणं नेतृत्वाचं कर्तव्य आहे. आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी तातडीचे निर्णय घ्यावे लागतात, आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे भावनिक वातावरण, तर दुसरीकडे राजकीय वास्तव या दोन टोकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अडकलेली दिसत आहे. पुढील काळात या निर्णयाचा पक्षावर आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.