मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भविष्याबाबत राजकीय वर्तुळात खळबळजनक चर्चांना उधाण आले आहे. "घड्याळाचे दोन विखुरलेले काटे पुन्हा एकत्र यावेत," ही अजितदादांची शेवटची इच्छा असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात असतानाच, आता या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला अचानक 'ब्रेक' लागल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे सलोख्याचे वारे वाहत असताना दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या 'यू-टर्न'मुळे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे स्वप्न सध्यातरी 'मृगजळ' ठरताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत सूचक आणि भावनिक भाष्य केले आहे. विलीनीकरणाच्या हालचाली केवळ कागदावर नव्हत्या, तर त्यामागे अजितदादांची सकारात्मकता होती, असे पाटील यांच्या बोलण्यातून जाणवते. विशेष म्हणजे, या काळात जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. "सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवासात अडथळे निर्माण करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच 'सपोर्टिव्ह' आहोत," असे म्हणत पाटील यांनी पवार कुटुंबातील नात्यांची वीण राजकीय संघर्षापेक्षा घट्ट असल्याचे अधोरेखित केले.
विलीनीकरणाच्या या चर्चेला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेमुळे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाच्या प्रस्तावावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे एकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच कोमेजली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, "नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे पक्ष एकत्र येणार की नाही?" असा प्रश्न आता तळागाळातील कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
दुसरीकडे, शरद पवार गटाचे दुसरे खंबीर नेते शशिकांत शिंदे यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आम्ही तूर्तास बंद करत आहोत," असे वक्तव्य करत शिंदे यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तटकरे आणि पटेल यांच्या विरोधानंतर शरद पवार गटाने देखील 'एक पाऊल मागे' घेत सध्यातरी स्वतंत्र अस्तित्वावरच भर देण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले 'विलीनीकरणाचे वारे' आता शांत झाले आहेत.
अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येणे हा एक पर्याय मानला जात होता. मात्र, राजकीय गणिते आणि जुन्या मतभेदांची धार अद्याप कमी झालेली नाही, हेच या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. "राजकारणात कधीही काहीही होऊ शकते," हे जरी खरं असलं तरी भविष्यात हे दोन्ही गट पुन्हा जवळ येतील का? की ही दरी अधिकच रुंदावेल? हे पाहणे आता महत्वाचे ठरेल. सध्यातरी विलीनीकरणाचा हा चेंडू नेत्यांच्या वादात अडकला असून, कार्यकर्त्यांना मात्र 'प्रतिक्षा' करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.