नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चाबांधणी सुरु केली आहे. स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये राजकारण रंगू लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाकडून थेट अजित पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा भाऊ भाजपात प्रवेश करणार आहे.
भाजपाकडून नाशिकमध्ये पक्षाची मोर्चाबांधणी सुरु आहे. नाशिक महापालिकेसह इतर स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांचे भाजपात प्रवेश होणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे हे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. भारत कोकाटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे माणिकराव कोकाटे यांना घेरण्यासाठी भाजपला मोठी संधी मिळाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
हेही वाचा: Bihar election 2025: भाजपने तिकीट दिल्यानंतर मैथिली ठाकूरची चर्चा; जाणून घ्या तिचे वय आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स
भारत कोकाटेंची कारकीर्द
भारत कोकाटे हे सिन्नर येथील सोमठाणेचे सरपंच म्हणून काम करत आहेत. नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर भारत कोकाटे यांनी काम केले आहे.
यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांना घरातूनच विरोध झाला होता. गेल्या काही वर्षात माणिकराव कोकाटे आणि त्यांंचे सख्खे भाऊ भारत कोकाटे यांच्यात मतभेद आहेत. या मतभेदाचा परिणाम कोकाटे यांच्या राजकारणावरही होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारत कोकाटे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना चांगले मतदान झाले, असे म्हटले जाते.
भारत कोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणार असल्यामुळे ऐन निवडणुकीच्या आधी ठाकरेंना धक्का बसणार आहे. तर दुसरीकडे सिन्नरमधील समीकरणे वेगाने बदलणार असल्याची शक्यता आहे. तसेच भाजपाकडून अजित पवारांना घेरण्याची तयारी सुरु आहे.