Monday, March 09, 2026 08:57:27 AM

NCP National Convention: राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे देण्यात आली 'ही' मोठी जबाबदारी

या अधिवेशनात पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

ncp national convention राष्ट्रवादीचा मोठा निर्णय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे देण्यात आली ही मोठी जबाबदारी

NCP National Convention: अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत पार पडले. या अधिवेशनात पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वरळी येथे आयोजित या मेळाव्यात पक्षाच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

महत्त्वाच्या नियुक्त्या आणि घोषणा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशनात नवीन नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली:
राष्ट्रीय अध्यक्ष: सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या सर्वोच्च पदी एकमताने निवड.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल यांची या पदावर फेरनिवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष: सुनील तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले.

भावूक आठवणी आणि तपासाची मागणी
अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1995 पासूनचा अजित पवारांचा राजकीय प्रवास आणि पुणे जिल्ह्यावरील त्यांची पकड यावर त्यांनी भाष्य केले. "दादांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 18 जानेवारीला झालेली आमची भेट शेवटची ठरली," असे वळसे पाटील भावूक होत म्हणाले. तसेच, अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात हा घातपात होता का, याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सखोल तपासाची मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा - NCP Parth Pawar : एकीकडे 'वहिनीपर्व' सुरू होत असताना पार्थ पवारांच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी

पक्षापुढील नवी आव्हाने
अजित पवारांच्या पश्चात पक्षाची एकजुट कायम राखण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे. जिल्हा परिषद आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री