Cyclone Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जो जोर पाहायला मिळतोय, त्याने नागरिकांसह प्रशासनालाही तणावाखाली ठेवले आहे. काही जिल्ह्यांत आधीच अतिवृष्टी झाली, शेतजमिनींच्या वरची माती वाहून गेली, पिकांना मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरपाईत अजूनही पूर्ण रक्कम मिळालेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ‘हवामान खात्याच्या’ ताज्या अंदाजामुळे काळजी वाढली आहे. भारतीय हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 4 नोव्हेंबरपासून ही प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
IMD च्या अंदाजानुसार उत्तर अंदमान समुद्रात 55 किमी प्रति तासाचा वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे समुद्र परिस्थिती ‘खवळलेली’ राहणार असून, मच्छिमारांना खास खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर अंदमान समुद्र आणि जवळच्या समुद्री क्षेत्रात मच्छिमारांनी बिलकुल प्रवेश करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. बोटचालक व समुद्र पर्यटन करणाऱ्यांनाही सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे.
अलीकडेच मोंथा चक्रीवादळाच्या फटक्याने तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस दिला. त्या चक्रीवादळाचे प्रभावानंतर अजूनही काही भागात दिसत आहेत आणि त्याच दरम्यान पुन्हा एक नवी प्रणाली निर्माण होत असल्याने हवामान अधिक 'अस्थिर'राहण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता नमूद केली गेली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचाही धोका वर्तवण्यात आला आहे. विशेषतः बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, आहिल्यानगर, सोलापूर या भागात पावसाचा जोर येऊ शकतो.
यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पाऊस थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. एक पाठोपाठ चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याने हवामान सतत बदलत्या स्वरूपात आहे. राज्यात पाऊस सतत पडतोय आणि त्यामुळे नागरिकांनीही सावधान राहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात पाऊस कायम राहू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, समुद्री व्यवसाय करणारे मच्छिमार आणि मोठे शहरे यांना आव्हानात्मक हवामान परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. 4 नोव्हेंबरपासून परिस्थिती अधिक तीव्र होईल, अशी स्पष्ट चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.