बीड जिल्ह्यातील परळी येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरू असतानाच या प्रकरणाला पुन्हा एकदा गंभीर कलाटणी मिळाली आहे. मुंडे यांच्या दोन्ही मुलांवर भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबाने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी प्रणव आणि प्रवीण मुंडे हे दोघे स्कुटीवरून सोमेश्वर नगर परिसरातून जात होते. परीक्षेसाठी मित्राकडून वही आणण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. याच दरम्यान एका तरुणाने त्यांना रस्त्यात अडवले. त्याने त्यांची ओळख विचारत नाव आणि वडिलांविषयी चौकशी केली. स्वतःला महादेव मुंडे यांचे पुत्र असल्याचे सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला आणि त्यानंतर शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप मुलांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या हातातील कडेही हिसकावून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी काही नागरिक उपस्थित होते, मात्र कोणीही हस्तक्षेप केला नसल्याची खंत मुलांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर मुंडे कुटुंबाने हा हल्ला केवळ योगायोग नसून पूर्वनियोजित असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे.
हल्ल्यातील संशयित तरुणाचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासल्यावर काही धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचे कथित संबंध कुख्यात आरोपी वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांशी असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मुंडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या कुटुंबाला गंभीर धोका असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. कुटुंबातील विविध सदस्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत संभाव्य हल्ल्याची भीती वर्तवली आहे. भविष्यात कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास संबंधित व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.