Saturday, June 14, 2025 04:57:09 AM

'नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर...'; नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानावर निलेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंनी सूचक सल्ला दिला आहे. महायुतीतील समन्वय राखण्याचा मुद्दा अधोरेखित होत असून, राजकीय वादाला नवा रंग मिळालाय.

 नितेशने जपून बोलावे मी भेटल्यावर नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानावर निलेश राणे काय म्हणाले

Nilesh Rane advises Nitesh Rane: भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखले जातात. अनेक वेळा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असाच एक प्रसंग अलीकडेच घडला आहे, ज्यात धाराशिव जिल्ह्यातील भाजप मेळाव्यात बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले, 'सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा.' त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

या वक्तव्यावर अनेक विरोधकांनी टीका केली असून, आता खुद्द नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही या वक्तव्यावर भाष्य करत सूचक सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विटर (एक्स) वर लिहिलं, 'नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे नेमका कोणाचा फायदा होतोय याचं भान असायला हवं.'

निलेश राणेंचा हा सल्ला केवळ भावाला दिलेला वैयक्तिक इशारा नसून तो महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि पक्षांतर्गत शिस्तीचाही मुद्दा अधोरेखित करतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, 'आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.'

हेही वाचा: कोल्ड्रिंकच्या ऍडने करिअरची सुरुवात... 2800 कोटींची मालकीण असूनही लपवलं खरं नाव; जाणून घ्या अभिनेत्रीची अचंबित करणारी लाईफस्टोरी

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी केलेली तीव्र प्रतिक्रिया ही शिवसेना नेत्यांवरचा स्पष्ट इशाराच होता. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामांवर भाजप आमदाराच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली होती. या विषयावरच बोलताना नितेश राणे यांनी, 'कोणी कितीही ताकद दाखवली तरी राज्यात फडणवीसच मुख्यमंत्री आहेत,' असेही स्पष्ट केलं.

राजकीय निरीक्षकांच्या मते, नितेश राणे यांची बोलण्याची शैली आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे केवळ विरोधकांचाच नाही तर आपल्या पक्षाच्या वाटचालीलाही कधी कधी अडथळा ठरू शकतात. त्यामुळे निलेश राणेंचा सल्ला ही एक प्रकारे सावधगिरीची सूचना मानली जात आहे.

राजकारणात स्पष्ट वक्तव्य महत्त्वाचं असलं, तरी ते कोणत्या संदर्भात, कोणत्या व्यासपीठावर, आणि कोणत्या प्रभावात केलं जातं याचा विचार आवश्यक असतो. अन्यथा त्याचे परिणाम केवळ विरोधकांकडूनच नाही तर मित्रपक्षांकडूनही टीकेचे कारण ठरू शकतात. सध्याच्या राजकीय स्थितीत, महायुतीतील ऐक्य टिकवणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे, आणि त्यासाठीच निलेश राणेंचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे.


सम्बन्धित सामग्री