सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. विशेषतः भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत मतभेद आता सोशल मीडियावर उघडपणे समोर येत आहेत.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम देसाई यांनी काही मतदारसंघांत स्वबळावर लढण्याची शक्यता व्यक्त करताच वादाला तोंड फुटले. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या बंधू आणि कुडाळचे आमदार निलेश राणेंना थेट युती धर्माची आठवण करून दिली.
हेही वाचा: 'मुख्यमंत्री हा कुणाचाही बाप नसतो, तो जनतेचा...'; नितेश राणेंच्या वक्तव्यावर वडिलांचा संताप
हेही वाचा: भावासाठी ट्विट केलं, पण नंतर डिलीट केलं? निलेश राणे म्हणाले, 'त्याने मला अधिकार...
नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्या माध्यमातून निलेश राणेंनी पक्ष पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसांपूर्वी महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल, अशी अपेक्षा करतो.'
गेल्या काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या मेळाव्यात नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, 'कोणी कितीही ताकद दाखवली किंवा नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील.' या विधानावर निलेश राणेंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत सल्ला दिला होता, त्यावर नितेश राणेंनीही उत्तर दिलं होतं.
हेही वाचा: 'नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर...'; नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानावर निलेश राणे काय म्हणाले?
आता पुन्हा एकदा दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने युतीतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर आल्यात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शीतयुद्धाचे पुढचे पडसाद काय उमटतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.