Wednesday, November 19, 2025 12:39:25 PM

'आता उठणं बसणं सुरूच राहणार...'; राज ठाकरेंकडून युती बाबत सूचक वक्तव्य

वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या भेटींबाबत सूचक विधान केले.

आता उठणं बसणं सुरूच राहणार राज ठाकरेंकडून युती बाबत सूचक वक्तव्य

Raj Thackeray Statement About Alliance: गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध सुधारताना दिसत आहेत. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावरील दोन्ही सरकारी निर्णय रद्द झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. जवळपास दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. या घटनेनंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मागील साडेतीन महिन्यांत तब्बल 11 वेळा त्यांनी एकमेकांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात दोघांच्या संभाव्य युतीबाबत चर्चांना चांगलाच वेग आला आहे.

वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या भेटींबाबत सूचक विधान केले. सुरुवातीलाच त्यांनी पत्रकारांवर विनोदी शैलीत टीका केली. 'आज मी रंगशारदाच्या हॉलमध्ये आलो आणि खाली बघितलं तर सभागृह रिकामं वाटलं. मग लक्षात आलं की सगळे पत्रकार वरती आहेत. तेही आपलेच आहेत, पण ते रोज माझ्या घराबाहेर उभे राहून माझे शूट करतात. त्यांना कंटाळा कसा येत नाही, हे मलाच कळत नाही, असं राज ठाकरेंनी मिश्कीलपणे म्हटलं.

हेही वाचा - Rajan Patil : भाजप प्रवेशाच्या महिन्याभरातच राजीनामा, अजितदादा-राजन पाटलांमध्ये खटके उडताय का?

ते पुढे म्हणाले, आज आमची यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक झाली. तिथे महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. बैठक संपल्यावर मी आणि उद्धव ठाकरे बाहेर आलो, आणि बाहेर पडताच मला वाटलं हे पत्रकार पुन्हा म्हणतील, ‘अरे ही अकरावी भेट!’ पण खरं सांगायचं तर आम्हीच मोजणं विसरलोय. राज ठाकरेंनी पुढे एक महत्त्वपूर्ण सूचक विधान केलं, 'असं भेटणं, बोलणं, उठणं-बसणं हे आता सुरूच राहणार आहे.' त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या संभाव्य युतीबाबतच्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे.

हेही वाचा - Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर पुन्हा संतापले; जैन बोर्डिंग वादाप्रकरणी पोलिसांकडे करणार तक्रार दाखल

शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांतील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण राहिले होते. मात्र अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद वाढल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण जर वास्तवात उतरले, तर महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठे बदल घडू शकतात.
 


सम्बन्धित सामग्री