Operation Tiger: ऑपरेशन टायगर संकटात? ठाकरे गटातील बंडाला खीळ; बंडखोर खासदाराच्या लेकीची मातोश्रीवर धाव

'ऑपरेशन टायगर'ला दुसरा मोठा धक्का ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्याकडून बसण्याची शक्यता आहे.

Operation Tiger: ऑपरेशन टायगर संकटात? ठाकरे गटातील बंडाला खीळ; बंडखोर खासदाराच्या लेकीची मातोश्रीवर धाव

Operation Tiger: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये पुन्हा एकदा मोठ्या फुटीचे संकेत मिळत असतानाच, आता या बंडाला अंतर्गत खिंडार पडल्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर 17 जून रोजी या खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्याने पक्षबदलाच्या वृत्ताला बळ मिळाले होते. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत पक्षप्रवेश किंवा घोषणा न झाल्यामुळे या 'ऑपरेशन टायगर'वर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

ओमराजे निंबाळकरांची धरसोड; मनधरणीचे प्रयत्न यशस्वी?
या संभाव्य बंडामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरत आहे. दिल्ली वारीत सामील असूनही ओमराजे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आणि ते तडकाफडकी पुण्यात परतले. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री पुण्यात जाऊन ओमराजेंची भेट घेतली. या गुप्त बैठकीनंतर ओमराजेंनी सकारात्मकता दाखवत सोमवारी 'मातोश्री'वर येण्याचे मान्य केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ओमराजेंच्या या बदललेल्या पवित्र्यामुळे बंडखोर गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजय दीना पाटलांच्या घरातून 'मातोश्री'शी संपर्क; राजुल पाटील थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला
'ऑपरेशन टायगर'ला दुसरा मोठा धक्का ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्याकडून बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातून 'नॉट रिचेबल' असलेल्या त्यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजुल पाटील अचानक 'मातोश्री'वर दाखल झाल्या आहेत. महापालिकेच्या कामकाजातून गायब असलेल्या राजुल पाटील थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राजुल पाटील या स्वतःची बाजू मांडण्यासाठी आल्या आहेत की आपले वडील संजय दीना पाटील यांचा काही नरमाईचा संदेश घेऊन आल्या आहेत? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

हेही वाचा – Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष; शिंदेंनी कोणावर सोपवली 'ऑपरेशन टायगर'ची जबाबदारी?

ठाकरेंचा थेट मतदारांशी संवाद; बंडखोरांच्या मतदारसंघात जाहीर सभांचे सत्र
दरम्यान, खासदार फुटल्याची कुणकुण लागताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडखोर खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी त्यांनी तातडीने दौऱ्यांचे नियोजन केले आहे. उद्धव ठाकरे थेट मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधणार असून, त्यांचा मराठवाडा दौरा आणि ईशान्य मुंबईतील जाहीर सभा आजच पार पडणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील खासदार आहेत, त्याच भागातील वॉर्ड क्रमांक 114 मधून राजुल पाटील प्रतिनिधित्व करतात. ठाकरेंच्या या आक्रमक दौऱ्यामुळे आणि खासदारांच्या कुटुंबियांकडून सुरू झालेल्या हालचालींमुळे 'ऑपरेशन टायगर' पूर्णपणे अपयशी ठरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number