रवि ढोबळे, प्रतिनिधी, सोलापूर: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे ते काही दिवसांपासून अंथरुणाला खिळले होते. बुधवारी संध्याकाळी सोलापुरातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी चार वाजता रूपा भवानी येथील हिंदू स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या अंत्यविधीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार ,पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी आदींसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि मारुती चित्तमपल्ली यांच्यावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा: 'स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार'
दीड महिन्यापूर्वीच म्हणजे 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.दिल्लीहून परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर काल सोलापूरमधील राहत्या घरी सायंकाळी 7 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने साहित्य ,पर्यावरण ,सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मारुती चिमपल्ली हे सोलापूर संपूर्ण भारताची भूषण होते.त्यांनी संपूर्ण आपली हयात वन्यजीव , वन्यप्राणी यांच्यावर अभ्यास केला.त्यावर चांगलं साहित्यही त्यांनी लिहिलं.पक्षी ,प्राणी यांच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केले.त्यावर साहित्य लिहिलं.त्यांच्या जाण्याने सर्वांना दुःख झालेला आहे.महाराष्ट्र सरकार ,भारत सरकार आणि जनतेच्या वतीने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशा भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केल्या.