Monday, February 09, 2026 02:03:14 PM

Arabian Sea Water: हाय अलर्ट! पालघर ते गुजरात समुद्रकिनारी 'भयावह' परिस्थिती; समुद्राचे पाणी उकळल्याने प्रशासनाची धावपळ

समुद्राच्या मध्यभागी अचानक मोठ्या प्रमाणात बुडबुडे निर्माण होऊन पाणी उकळू लागले आहे. मच्छिमारांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये पाण्याचा एक मोठा पृष्ठभाग जणू काही उकळत्या लाव्हाप्रमाणे खळाळताना दिसत आहे.

arabian sea water हाय अलर्ट पालघर ते गुजरात समुद्रकिनारी भयावह परिस्थिती समुद्राचे पाणी उकळल्याने प्रशासनाची धावपळ

पालघर: निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव आपण अनेकदा घेतो, मात्र सध्या अरबी समुद्राच्या पोटांतून जे दृश्य समोर येत आहे, त्याने मच्छिमारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती सागरी क्षेत्रात समुद्राचे पाणी चक्क गॅसवर ठेवलेल्या भांड्यातील पाण्याप्रमाणे उकळू लागले आहे. या भागातून समोर आलेले व्हिडिओ पाहून प्रशासकीय यंत्रणा हादरली असून, पालघरपासून गुजरातपर्यंतच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न आता किनारपट्टीवरील नागरिकांना पडले आहेत.

काय आहे नेमकी घटना?

समुद्राच्या मध्यभागी अचानक मोठ्या प्रमाणात बुडबुडे निर्माण होऊन पाणी उकळू लागले आहे. मच्छिमारांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये पाण्याचा एक मोठा पृष्ठभाग जणू काही उकळत्या लाव्हाप्रमाणे खळाळताना दिसत आहे. हे केवळ लाटांचे स्वरूप नसून, खालून येणाऱ्या प्रचंड दाबामुळे पाणी वर ढकलले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी या घटनेला 'अत्यंत गंभीर आणि असामान्य' असे संबोधले आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर अशा प्रकारे पाणी उकळणे ही नैसर्गिक प्रकिया नसून, यामागे एखादे मोठे संकट दडलेले असण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: Sahar Shaikh: "प्रभाग 30 मध्ये फिरताना दिसला तर..." मुंब्र्यात एमआयएमच्या विजयानंतर सहर शेख यांचा आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल

औद्योगिक 'कारण' की नैसर्गिक हालचाल?

या गूढ घटनेमागे तज्ज्ञांनी प्रामुख्याने दोन शक्यता वर्तवल्या आहेत. पहिली शक्यता म्हणजे, या भागात असलेल्या खोल सागरी औद्योगिक पाईपलाईनला लागलेली गळती. गुजरात आणि महाराष्ट्राचा हा पट्टा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असल्याने समुद्राच्या खालून गॅस आणि कच्च्या तेलाच्या असंख्य वाहिन्या गेल्या आहेत. जर ही गॅस गळती असेल, तर समुद्रातील ऑक्सिजनची पातळी घटून 'मरीन इकोसिस्टम' उद्धवस्त होऊ शकते. दुसरी शक्यता म्हणजे, समुद्राच्या तळाशी होणारी भूगर्भीय हालचाल (Geological Activity) किंवा ज्वालामुखीसदृश प्रक्रिया. या दोन्ही शक्यतांचा तपास करण्यासाठी सागरी आणि औद्योगिक संस्थांचे विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

पालघर आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परतेने मच्छिमारांना या विशिष्ट क्षेत्रापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर ही गॅस गळती असेल, तर परिसरात आगीचा मोठा धोका संभवतो. तसेच, पाण्याखालील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मच्छिमारांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. "सावधानता बाळगणे हाच सध्याचा एकमेव उपाय आहे," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मोठ्या जहाजांनाही या मार्गावरून जाताना वेग मर्यादित ठेवण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विनाशाच्या उंबरठ्यावर सागरी पर्यावरण?

तज्ज्ञांच्या मते, ही घटना केवळ मानवी भीतीपुरती मर्यादित नसून सागरी जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर विषारी वायू किंवा रसायनांची गळती होत असेल, तर लाखो मासे आणि समुद्री जीव मृत्युमुखी पडण्याची भीती आहे. सध्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून त्याचा प्रयोगशाळेत अभ्यास सुरू आहे. पाण्याचे तापमान आणि त्यातील रसायनांचे प्रमाण तपासल्यानंतरच यामागचे खरे सत्य समोर येईल.

हेही वाचा: Rupali Thombare Patil : 'घड्याळाला मतदान केलं तर मत भाजपाला जातं असं नाही', रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य


सम्बन्धित सामग्री