नवी दिल्ली: पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाने ‘पंचम’ नावाचा चॅटबॉट सुरू करण्याची घोषणा केली असून, हा चॅटबॉट निर्वाचित प्रतिनिधी, अधिकारी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे ही सेवा WhatsApp आधारित असून, पंचायतराज संबंधित माहिती आणि सेवांचा थेट डिजिटल प्रवेश देणारी आहे.
केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाने रविवारी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, 25 जानेवारी रोजी ‘पंचम’ चॅटबॉट अधिकृतपणे सेवेत दाखल केला जात आहे. पंचायतराज व्यवस्थेसाठी हा एक डिजिटल साथी म्हणून विकसित करण्यात आला असून, दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पंचम’ चॅटबॉटमुळे केंद्र सरकार आणि देशभरातील सुमारे 30 लाखांहून अधिक पंचायत निर्वाचित प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात थेट डिजिटल संपर्क प्रस्थापित होणार आहे. पंचायत व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा थेट आणि तंत्रज्ञानाधारित संवाद प्रथमच घडत असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा: दस्त नोंदणीला वेग! नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय, राज्यात 60 खासगी दस्तनोंदणी केंद्रे सुरू होणार
हा चॅटबॉट थेट WhatsApp वर उपलब्ध असल्यामुळे तो वापरणे अतिशय सोपे असेल. भारतात बहुतांश स्मार्टफोन वापरकर्ते WhatsApp वापरत असल्याने, कोणतेही नवीन अॅप डाउनलोड करण्याची किंवा वेगळे तंत्रज्ञान शिकण्याची गरज भासणार नाही. वापरकर्त्यांना हा चॅटबॉट म्हणजे WhatsApp वर साध्या संवादासारखाच अनुभव देणारा ठरणार आहे.
‘पंचम’ चॅटबॉट ई-ग्राम स्वराज प्रणालीशी थेट जोडलेला असून, पंचायत अधिकारी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकांचा वापर करतो. यामार्फत ई-ग्राम स्वराज तसेच मंत्रालयाच्या प्रमुख योजना आणि उपक्रमांची माहिती मिळणार आहे. सध्या हा चॅटबॉट निश्चित स्वरूपातील माहिती पुरवणार असला, तरी ती माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सामान्य नागरिकांनाही ‘पंचम’ चॅटबॉटचा लाभ घेता येणार आहे. ग्रामपंचायतीमधील सेवा, प्रमाणपत्रे, सरकारी योजना आणि आवश्यक प्रक्रियांबाबतची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. एकूणच, तंत्रज्ञानाच्या मदतीने गावपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम, सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने ‘पंचम’ चॅटबॉट हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
हेही वाचा: Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलच्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री ? RJ महवशनंतर आता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसोबत दिसला स्टार क्रिकेटर