NCP New Strategist: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळासाठी मजबूत करण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी मिळून राष्ट्रवादीचा नवा ‘चाणक्य’ शोधला आहे. देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा आणि प्रचार मोहीम ठरवणार आहेत. यापूर्वी पक्षाचे ‘गुलाबी ब्रँडिंग’ करणाऱ्या नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेचा करार संपल्याने हा मोठा बदल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल (19 मे) सकाळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या गुप्त बैठकीत राष्ट्रवादीच्या भवितव्यावर आणि आगामी निवडणुकांच्या रोडमॅपवर सविस्तर खल झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी या भागीदारीवर शिक्कामोर्तब केले असून, पुढील 2 दिवसांत या कराराच्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील. 1 जूनपासून प्रशांत किशोर आणि त्यांची टीम अधिकृतपणे मैदानात उतरणार आहे. पुढील 3 वर्षांचा काळ पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, राष्ट्रवादीने थेट 2029 च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आतापासूनच पायाभरणी सुरू केल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोण आहेत प्रशांत किशोर?
देशव्यापी ओळख पाहता, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळून त्यांना बहुमतापर्यंत पोहोचवण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता, यानंतरच ते ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. केवळ भाजपच नव्हे, तर त्यांनी देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना सत्तेची चव चाखायला लावली आहे, यात बिहारमध्ये नितीश कुमार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षांचा समावेश असून ते ‘जन सुराज पक्षा’चे संस्थापकही आहेत. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात (UN) सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 8 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे.
नरेश अरोरांचे ‘गुलाबी पर्व’ आणि एक्झिट:
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इमेज मेकओव्हरची आणि प्रसिद्धीची सर्व सूत्रे ‘डिझाईन बॉक्स’चे सहसंस्थापक नरेश अरोरा यांच्या हातात होती. काँग्रेसला राजस्थान आणि कर्नाटकात यश मिळवून देणाऱ्या अरोरा यांनी लोकसभा निवडणुकीतील पडझडीनंतर राष्ट्रवादीला सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या ‘लाडकी बहीण योजने’दरम्यान अजित पवार यांनी परिधान केलेले ‘गुलाबी जॅकेट’ आणि संपूर्ण महाराष्ट्रात चालवलेले ‘गुलाबी कॅम्पेन’ ही नरेश अरोरा यांचीच संकल्पना होती व या धडाकेबाज कँपेनिंगमुळेच पक्षाला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले होते.
नव्या पर्वाची सुरुवात:
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ‘डिझाईन बॉक्स’ने आपले काम थांबवले होते. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि आगामी काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ‘पीके’ यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक रणनीतीकाराची निवड केली आहे. प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्या रंगात आणि नव्या ढंगात जनतेसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे.