मुंबई: लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. माहितीनुसार, दिवा ते कोपर या स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पुष्पक एक्सप्रेस लखनौला निघाली होती. एक्सप्रेसमधून 8 ते 10 प्रवासी खाली पडले असून 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय म्हणाले मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी?
'घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात आहे', अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. 'त्याचप्रमाणे, या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही', अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी स्पष्ट केले. 'हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही, तर रुळाच्या बाजूला पडले', असं लीला यांनी सांगितले आहे. हे प्रवासी एक्स्प्रेसमधून नेमके कसे पडले? हे प्रवासी एक्सप्रेसमधून पडले की लोकल ट्रेनमधून? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.