Pet dog Attack Neighbor प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
मुंबई: शेजाऱ्याला पाळीव कुत्रा चावल्याने मुंबईत दंडाधिकारी न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला 4 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच, न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला चार हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दोन्ही शिक्षा एकाच वेळी लागू होतील. दंड न भरल्यास कुत्र्याच्या मालकाला अतिरिक्त 15 दिवसांची शिक्षा भोगावी लागेल, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
कुत्र्याच्या मालकाला सक्तमजुरीची शिक्षा -
वरळीतील अल्फा अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्याला नियंत्रित करण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या प्रकरणात, मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला चार महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 1 फेब्रुवारी 2018 रोजी घडली. ऋषभ मौशिक पटेल नावाच्या व्यक्तीच्या हस्की जातीच्या कुत्र्याने शेजारी राहणाऱ्या रमिक शाह यांचा चावा घेतला होता.
दरम्यान, न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग सुहास विजय पी. भोसले यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, वारंवार इशारा देऊनही आरोपीने कुत्र्याला जबरदस्तीने लिफ्टमध्ये ओढले. सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत न्यायालयाने म्हटले की, आरोपीने केवळ त्याच्या पाळीव कुत्र्याबद्दल संवेदनशीलता दाखवली नाही तर लिफ्टमध्ये आधीच उपस्थित असलेल्या व्यक्तीची, त्याच्या दीड वर्षाच्या मुलाची आणि घरकाम करणाऱ्या नोकराचीही त्याला पर्वा नव्हती. घटनेच्या वेळी पीडितेचा दीड वर्षाचा मुलगा देखील त्याच्यासोबत लिफ्टमध्ये उपस्थित होता. आरोपीने ज्या पद्धतीने कुत्र्याला जबरदस्तीने आत ओढले त्यावरून हे सिद्ध होते की, तो त्याच्या पाळीव प्राण्याबद्दल संवेदनशील नाही. तसेच त्याला इतर लोकांच्या सुरक्षिततेची जाणीव नाही. अशा परिस्थितीत आरोपीला जास्त दया दाखवता येणार नाही.
हेही वाचा - VIDEO : शिकाऱ्याची शिकार..! शार्कने बेसावध मगरीला पकडलं आणि अख्खी मगरच एका घासात केली फस्त!
घटनेनंतर पीडित रमिक शाहने वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 324 (जाणूनबुजून दुखापत), 289 (पाळीव प्राण्यांच्या संबंधात निष्काळजीपणा) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण; रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली
न्यायालयाने आरोपीला ठोठावला दंड -
न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम 324 आणि 289 अंतर्गत दोषी ठरवले. कलम 324 अंतर्गत न्यायालयाने चार महिने सक्तमजुरी आणि 3,000 रुपये दंड ठोठावला. तर आयपीसीच्या कलम 289 अंतर्गत तीन महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावली आहे.