सातारा: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्याशी गैरवर्तन, धमकावणे आणि त्यानंतर सोशल मीडियावर कथित सुसाईड नोट व्हायरल झाल्याने हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. या घटनेनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी प्रसाद कोंडेदेशमुख हे त्यांच्या खासगी अंगरक्षकासह फलटण उपजिल्हा रुग्णालयात आले होते. बंदुकीच्या परवान्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र तातडीने देण्याची त्यांनी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वैद्यकीय नियमांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय असे प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रसाद कोंडेदेशमुख यांनी आपण माजी मंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही डॉ. रूपनवर यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एका डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
थेट माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप करत डॉक्टरने स्टेटस ठेवले. तळहातावर सुसाईड नोट लिहिली. @Dev_Fadnavis#धक्कादायक pic.twitter.com/7iXVa0N0i4 — SushmaTai Andhare (@andharesushama) July 30, 2026
यानंतर हे प्रकरण रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. एस. मदने यांच्यापर्यंत पोहोचले. डॉ. रूपनवर यांना त्यांच्या दालनात बोलावण्यात आले. त्यावेळी प्रसाद कोंडेदेशमुख यांनी डॉक्टरांना धमकावल्याचा, कॉलर पकडून ढकलल्याचा तसेच त्यांच्यासोबत असलेल्या खासगी अंगरक्षकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. “उद्या सकाळपर्यंत तुझे काय होते ते बघ,” अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी डॉ. रूपनवर यांना चौकशीसाठी सातारा येथे हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली. तसेच कामावरून कमी केल्याचे पत्रही देण्यात आल्याचा आरोप आहे. या सर्व घडामोडींमुळे मानसिक तणावात असलेल्या डॉ. रूपनवर यांनी वहीच्या पानावर सुसाईड नोट लिहून तिचा फोटो आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर ठेवला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर फलटण पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत डॉ. रूपनवर यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. चौकशीदरम्यान संपूर्ण प्रकार उघड झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
डॉ. रूपनवर यांच्या तक्रारीच्या आधारे फलटण पोलिसांनी प्रसाद कोंडेदेशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असून संबंधितांचे जबाब नोंदवले जात आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील दबाव आणि धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.