अविनाश पर्बत – पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील महाळुंगे येथील विबग्योर शाळेत काल दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एकाच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी भाग पाडल्याने अल्पवयीन विद्यार्थ्याने हा हल्ला केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला महाळुंगे येथील एका शाळेतील सहल ही पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी गेली होती. त्या दरम्यान तिथे विद्यार्थिनी डान्स करत असताना आरोपी विद्यार्थ्याने त्याचा व्हिडिओ तयार करून आपल्या इंस्टाग्रामवर टाकला होता. त्यानंतर या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने विद्यार्थ्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला होता. याचाच राग मनात धरून विद्यार्थ्याने आपल्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर धारदार चाकूने हल्ला करत तिला गंभीर जखमी केलं आहे. या घटनेत विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणात बावधन पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.