Sunday, June 15, 2025 10:16:02 AM

वाढदिवसा दिवशी संपवले आयुष्य… 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

पनवेल तालुक्यात सोनम केणीने मुलीची हत्या करून आत्महत्या केली. सासरच्यांच्या मानसिक व आर्थिक छळामुळे ही घटना घडली, आरोपी अजून फरार आहेत, न्यायासाठी कुटुंबीय लढत आहेत.

वाढदिवसा दिवशी संपवले आयुष्य… 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

नवी मुंबई: पनवेल तालुक्यातील पेठाळी गावात सोनम केणी या तरुणीच्या वाढदिवशी घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. आपल्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असली, तरी ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

सोनम पाटील हिचा विवाह 2018 साली पेठाळी गावातील अभिषेक केणी याच्यासोबत झाला होता. 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर सासरच्यांकडून मुलगाच व्हावा यासाठी भगत, भोंदू बाबा यांच्याकडून अघोरी उपचार, औषधोपचार सुरू झाले. 2024 मध्ये दुसरी मुलगी झाल्यानंतर तिचा अवघ्या दोन महिन्यांत संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर सोनमवर पुन्हा बाळासाठी दबाव टाकण्यात आला. सासूला मुलगी नको होती, असे सोनमने आपल्या बहिणीकडे सांगितले होते.

सोनमवर सासरच्यांकडून केवळ मुलासाठीच नव्हे, तर घर बांधकामासाठी 20 लाख रुपयांची मागणीही करण्यात आली. या सर्व मानसिक आणि आर्थिक छळामुळे सोनम तणावाखाली होती. शेवटी 25 मे रोजी स्वतःच्या वाढदिवशीच तिने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली.

या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, सोनमने लिहिलेल्या 8 पानी सुसाईड नोटमध्ये सासरच्या लोकांनी केलेल्या छळाचा सविस्तर उल्लेख आहे. तळोजा पोलीस ठाण्यात पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महिनाभर उलटूनही आरोपी फरार आहेत.

सोनमच्या वडिलांनी आणि बहिणीने गंभीर आरोप करत सांगितले की, 'ही आत्महत्या नसून आमच्या मुलीची हत्या आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. आम्हाला न्याय मिळायला हवा.' सध्या आरोपी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेत आहेत, पण पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट आहे.

सोनमसारख्या अनेक महिलांवर आजही समाजात केवळ मुलगा न झाल्यामुळे अमानुष छळ होतो. ही केवळ एक घटना नाही, तर समाजातील स्त्रियांच्या असुरक्षिततेचं भयावह चित्र आहे.


सम्बन्धित सामग्री