Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना छातीत संसर्ग (Chest Infection) झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आता सकारात्मक माहिती समोर येत असून, रुग्णालयाने त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजकीय मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून पवारांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांचे वैद्यकीय बुलेटिन
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. सायमन ग्रँट यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, कालच्या तुलनेत आज त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. त्यांना सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले असून आवश्यक ते सर्व उपचार सुरू आहेत. उपचारांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आणि रुग्णालयातील इतर रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे कळकळीचे आवाहनही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळेंनी दिली सविस्तर माहिती
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ द्वारे वडिलांच्या प्रकृतीची माहिती देऊन कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शरद पवारांना केवळ छातीत संसर्ग झाला असून इतर सर्व महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना 5 दिवसांचा अँटीबायोटिक्स कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या सर्व हितचिंतकांच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.
Baba has developed chest congestion and will need a 5-day course of antibiotics. Fortunately, all other vital parameters are normal. Thank you all for your good wishes and constant support. A heartfelt thank you to all the doctors from the bottom of my heart. ? — Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2026
शरद पवारांना डिस्चार्ज कधी मिळणार
पंतप्रधान मोदींच्या फोननंतर राजकीय वर्तुळातूनही पवारांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. प्रकृतीतील झपाट्याने होणारी सुधारणा पाहता, शरद पवारांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी रुग्णालयातून सुट्टी (Discharge) मिळण्याची दाट शक्यता आहे. रुग्णालयातून घरी परतल्यानंतरही त्यांना काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जाण्याची शक्यता आहे.