मुंबईत नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याची बदली करत विभागीय चौकशी सुरू केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस वाहनात बसवलेल्या विद्यार्थ्यांशी एक पोलीस कर्मचारी आक्रमक भाषेत बोलताना दिसतो. "पुन्हा आंदोलनात दिसलात तर 50 ग्रॅम पावडर (ड्रग्स) खिशात टाकून अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवू," अशा आशयाची धमकी तो विद्यार्थ्यांना देत असल्याचे ऐकू येते. हा व्हिडिओ बुधवारी चित्रित झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर या प्रकरणाने मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले.
काही वृत्तांनुसार, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पवन सांगळे असून तो मुंबईतील सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने बदली केली असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर विरोधी पक्षांसह विविध राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
'दहिसरकर' नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ प्रथम व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमधील संभाषण आणि पोलिसाच्या कथित धमकीमुळे पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, चौकशीनंतर या प्रकरणात पुढील कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.