Parinay Fuke : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत काही 'सत्तापिपासू' लोकांनी त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या 'पक्ष विलीनीकरण' दाव्याचा समाचार घेताना फुके यांनी ही टीका केली.
नेमका वाद काय?
अनिल देशमुख यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला होता की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्यासंदर्भात आतापर्यंत 14 बैठका पार पडल्या आहेत. यातील अनेक बैठकांना खुद्द शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असेही देशमुखांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
परिणय फुके यांचे प्रत्युत्तर
अनिल देशमुखांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार परिणय फुके यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, "अजित पवार आता हयात नाहीत, ही संधी साधून काही स्वार्थी आणि सत्तापिपासू लोकांनी त्यांचा पक्ष बळकावण्याचे षडयंत्र रचले आहे. मात्र, सुनेत्रा पवार या खंबीर आहेत आणि त्या हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत." फुके यांनी पुढे देशमुखांवर वैयक्तिक टीका करताना म्हटले की, "अनिल देशमुख हे दीर्घकाळ सत्तेत राहिले आहेत. आता सत्तेपासून दूर राहिल्यामुळे त्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा मोह आवरत नाहीये. याच सत्तेच्या हव्यासापोटी ते अशा प्रकारची तथ्यहीन वक्तव्ये करत आहेत."
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : आदित्य ठाकरेंनी घेतली पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट; विमान अपघातातील निधनानंतर व्यक्त केल्या शोकसंवेदना
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे फुके यांनी म्हटले आहे. 'अजितदादांनी उभा केलेला पक्ष त्यांच्या विचारानेच पुढे जाईल आणि सुनेत्रा पवार पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळतील,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, अनिल देशमुखांच्या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, फुके यांच्या या पलटवारामुळे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.