मुंबई: सोशल मीडियाच्या दुनियेत निखळ हास्याने आणि अस्सल अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या प्रथमेश कदमचा अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. हसता-खेळता चेहरा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने चाहत्यांच्या मनाला मोठा धक्का बसला आहे. प्रथमेशने आत्महत्या केली असावी, अशा चर्चांना उधाण आले असतानाच त्याच्या आईने समोर येत मृत्यूचे विदारक सत्य मांडले आहे. प्रथमेशला 'पांढऱ्या काविळी'ने (White Jaundice) ग्रासले होते आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर आरोग्य विश्वात खळबळ उडाली असून, नक्की हा आजार काय आहे आणि तो इतका जीवघेणा कसा ठरू शकतो, हे समजून घेणे काळाची गरज बनले आहे.
काय आहे 'पांढरी कावीळ'? डॉक्टरांचा इशारा
तज्ज्ञ डॉक्टर छाया वजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरी कावीळ ही शरीरातील यकृत (Liver), पित्ताशय किंवा रक्ताशी संबंधित गंभीर बिघाड दर्शवणारी स्थिती आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर, जेव्हा शरीरात 'बिलीरुबिन' या पिवळ्या रंगद्रव्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढते, तेव्हा त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर पडू लागतो. सामान्य काविळीकडे वेळीच लक्ष न दिल्यास किंवा योग्य उपचार न झाल्यास त्याचे रूपांतर 'पांढऱ्या काविळी'त होते. हा आजार एखाद्या छुप्या शत्रूप्रमाणे शरीरावर आक्रमण करतो आणि यकृताला निकामी करून रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो.
हेही वाचा: T20 World Cup 2026 : नवख्या नामिबियाची कडवी झुंज, पण टीम इंडियाचे गोलंदाज ठरले गेमचेंजर
लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे संकटाना निमंत्रण
पांढऱ्या काविळीची सुरुवात अत्यंत सौम्य लक्षणांनी होते, ज्यामुळे अनेकदा रुग्ण त्याकडे 'सामान्य आजार' म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, हीच चूक महागात पडू शकते. डॉ. वजा सांगतात की, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होणे, शौचाचा रंग फिकट (पांढऱ्या मातीसारखा) होणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. याशिवाय सततचा थकवा, भूक मंदावणे, मळमळ, उलट्या आणि पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होणे या गोष्टी आढळल्यास सावध होणे गरजेचे आहे. गंभीर अवस्थेत रुग्णाला विस्मरण होणे, अति झोप येणे किंवा कोमात जाण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी' म्हणतात.
कारणे आणि धोके
पांढरी कावीळ होण्यामागे केवळ एकच कारण नाही, तर अनेक घटकांचा यात समावेश असू शकतो. प्रामुख्याने हेपेटायटिस A, B, C किंवा E सारखे विषाणूजन्य संसर्ग यकृताला भारी पडतात. याव्यतिरिक्त बदललेली जीवनशैली, अति मद्यपान, फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस ही देखील प्रमुख कारणे आहेत. काही रुग्णांमध्ये पित्ताशयातील खडे (Gallstones) किंवा पित्तनलिकेत अडथळा निर्माण झाल्यामुळे, तर काहींमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे ही स्थिती ओढवू शकते. काही विशिष्ट औषधांचा अतिरेक किंवा दुष्परिणामही यकृतासाठी घातक ठरू शकतो.
निदान आणि उपचार
या आजाराचे अचूक निदान करण्यासाठी केवळ रक्ताची तपासणी पुरेसी ठरत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT), बिलीरुबिन (Total, Direct, Indirect), SGOT, SGPT यांसारख्या रक्ततपासण्यांसह, पोटाचे अल्ट्रासाऊंड (USG), सीटी स्कॅन किंवा एमआरआय (MRI) करणे अनिवार्य असते. उपचारांची दिशा आजाराच्या मूळ कारणावर अवलंबून असते. व्हायरल हेपेटायटिसमध्ये विश्रांती आणि औषधांनी फरक पडतो, तर पित्ताशयात खडे किंवा अडथळा असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. दुर्दैवाने, प्रथमेश कदमच्या बाबतीत घडले तसे, यकृत पूर्णपणे निकामी झाल्यास 'लिव्हर ट्रान्सप्लांट' हाच शेवटचा पर्याय उरतो.
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय
'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे प्रथमेशच्या निधनातून धडा घेत प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दूषित पाणी आणि अन्नातून पसरणारा हा संसर्ग टाळण्यासाठी पाणी उकळून पिणे, रस्त्यावरील उघडे व तेलकट खाद्यपदार्थ टाळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मद्यपानासारख्या व्यसनांपासून दूर राहणे यकृताच्या आरोग्यासाठी हितकारक ठरते. घरगुती उपायांच्या नादात वेळ न घालवता, काविळीची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून वेळेत उपचार मिळून जीव वाचवता येईल.
हेही वाचा: Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये कट्टरवादाला 'तलाक', लोकशाहीची नवी पहाट; हे सत्तांतर भारतासाठी का महत्वाचे?