शेगाव: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमणाऱ्या संतनगरी शेगावच्या पावन भूमीत लवकरच भक्ती आणि राष्ट्रशक्तीचा एक अपूर्व संगम पाहायला मिळणार आहे. देशाच्या प्रथम नागरिक, महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 25 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये येत आहेत. राष्ट्रपतींच्या या ऐतिहासिक आगमनामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून, प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे शेगाव येथील श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबिरा'चे उद्घाटन. आरोग्याप्रती जनजागृती आणि भारतीय उपचार पद्धतीला चालना देणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे सारथ्य राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, संतनगरीत सुरक्षेचे अभेद्य कवच तैनात करण्यात आले आहे.
हेही वाचा: Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेते शोकाकूल, स्व. अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा दौरा असल्याने, राजशिष्टाचार (Protocol) आणि सुरक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासनाकडून दौऱ्याची सुरक्षा पाहणी (Mock Drill) घेतली जाईल. या तालीमीदरम्यान सुरक्षेची बहुस्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याने, श्रींचे दर्शन सकाळी साडेदहा ते दुपारी बार या वेळेत भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे.
दौऱ्याच्या मुख्य दिवशी, म्हणजेच बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा महामहीम राष्ट्रपती श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिरात येतील, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. त्या दिवशी सकाळी साडेसात ते दुपारी साडेबार वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन पूर्णपणे बंद राहील. दुपारी साडेबार नंतर श्रींचे दर्शन पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू करण्यात येईल. भाविकांनी वेळेतील या बदलाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानने केले आहे.
शेगाव संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. राष्ट्रपतींचा हा दौरा केवळ शेगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. श्रद्धेचा जनसागर आणि सुरक्षेचा कडक पहारा अशा स्थितीत, शिस्त आणि भक्तीचा आदर्श घालून देत राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी संतनगरी सज्ज झाली आहे. भाविकांनी या काळात शांतता राखून आणि नियोजित बदलांचे पालन करून सहकार्य करावे, हीच माऊलींची खरी सेवा ठरेल.
हेही वाचा: T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेकडून 'फटका'; आता झिम्बाब्वे-विंडीज सोबतच्या सामन्यांचे टेन्शन, टीम इंडियात मोठ्या फेरबदलांचे संकेत