Wednesday, July 09, 2025 09:29:08 PM

महापालिका प्रशासनाच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे अन्नत्याग आंदोलन

महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी स्वराज्य पक्षाचं उपोषण सुरु. चुकीचे कृत्य असूनही कारवाई न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया. नवे आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष.

महापालिका प्रशासनाच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे अन्नत्याग आंदोलन

अजय घोडके, प्रतिनिधी; लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. शंकर भारती व शहर कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर कलवले या दोन अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात लातूर शहर महानगरपालिकेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. 

 लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे  डॉ. शंकर भारती यांची फेब्रुवारी,2025 मध्ये अहमदपूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व एप्रिल, 2025 मध्ये कुष्ठरोग सहाय्यक संचालक कार्यालयात बदलीचे आदेश निघूनही मागील दोन महिन्यापासून ते महापालिकेत अद्याप कार्यरत आहेत. तसेच महापालिकेचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक  रामेश्वर कलवले यांनी लातूरचे माजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापालिका आयुक्त  अमन मित्तल यांच्या बनावट शिक्का व स्वाक्षरी वापरून स्वतःचा मूल्यांकन अहवाल ( Performance Report) तयार करून शासन-प्रशासनाची दिशाभूल केल्याचे चौकशी अहवालात फेब्रुवारी 2024 मध्ये निष्पन्न झाले आहे. शासनाच्या विभागीय उच्चस्तरीय चौकशीने दोषी ठरवल्यानंतरही मागील तब्बल दीड वर्षापासून रामेश्वर कलवले अद्याप महापालिकेत कार्यरत आहेत. 

महापालिकेतील या दोन अधिकाऱ्यांना महापालिकेचे उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे व आरोग्य उपसंचालक अर्चना किर्दक-भोसले यांचे अभय असून डॉ. शंकर भारती यांच्या महापालिकेतील कामकाज रद्द केल्याचे आदेश निर्गमित होउनही दोन महिने उलटले तरी महापालिका प्रशासन त्यांना कार्यमुक्त का करत नाही? आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना किर्दक-भोसले या शासनाचे आदेश न जुमानणाऱ्या डॉ. शंकर भारती यांच्यावर निलंबनाची कारवाई का करत नाहीत? असा असा संतप्त सवाल स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा उपोषणकर्ते अशोकराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त  आयुक्त मानसी मीना डॉ.शंकर भारती व रामेश्वर कलवले या दोघांवर कोणती कारवाई करणार याची लातूरकरांना उत्सुकता आहे.


सम्बन्धित सामग्री