Pune Municipal Corporation Election : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पुण्यातील रक्ताळलेले गँगवॉर आता राजकीय रणांगणात उतरले आहे. आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबांतील टोकाचा संघर्ष इतका विकोपाला गेला आहे की, आता तो केवळ गुन्हेगारीपुरता मर्यादित न राहता थेट तिकिटासाठीच्या लढाईत रूपांतरित झाला आहे.
निवडणुकीच्या रिंगणात गुन्हेगारीचे सावट
पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याने महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, त्याला न्यायालयाने तांत्रिक परवानगीही दिली आहे. केवळ बंडूच नाही, तर माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि मृत वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यादेखील आंदेकर कुटुंबाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. सध्या बंडू आंदेकर कारागृहात असला, तरी तुरुंगातूनच त्याने निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आंदेकरांच्या उमेदवारीला 'आयुष'च्या आईचा तीव्र विरोध
गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला आहे. "माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना जर कोणत्याही पक्षाने तिकीट दिले, तर मी स्वतःला जाळून घेईन," असा हृदयद्रावक इशारा कल्याणीने दिला आहे. वनराज आंदेकर हत्येचा सूड म्हणून गणपती विसर्जनादरम्यान कल्याणीचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये आंदेकर टोळीचा सहभाग असल्याचे आरोप कोमकर कुटुंबीयांकडून केले जात आहेत.
हेही वाचा – PCMC Election : निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि ठाकरेंना 'दे धक्का'! भाजपने बडा नेता फोडला
कल्याणी कोमकर यांची शिंदे सेनेकडून मुलाखत
एकीकडे आंदेकर कुटुंबाला विरोध करत असतानाच, कल्याणी कोमकर यांनी स्वतः राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी 19 डिसेंबर रोजी शिवसेना भवन येथे मुलाखत दिली. प्रभाग क्रमांक 23 (रविवार पेठ आणि नारायण पेठ) मधून त्या इच्छुक आहेत. या मुलाखतीवेळी नीलम गोऱ्हे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते. त्यामुळे आता या प्रभागात आंदेकर विरुद्ध कोमकर असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
नात्यातील रक्ताळलेला संघर्ष
पुण्यातील या संघर्षाचे सर्वात भयानक रूप म्हणजे हा वाद आता रक्ताच्या नात्यात पोहचला आहे. आयुष कोमकरच्या हत्येचा सूत्रधार त्याचा स्वतःचा आजोबाच असल्याचे धागेदोरे तपासात मिळाले आहेत. वनराज आंदेकर यांची हत्या आणि त्यानंतर झालेला आयुषचा खून या घटनांमुळे पुणे शहरात दहशतीचे वातावरण आहे. आता हाच रक्ताचा हिशोब मतपेटीच्या माध्यमातून चुकता करण्यासाठी दोन्ही कुटुंबे आमनेसामने आली आहेत.
पुणेकरांच्या मनात भीतीचे काहूर
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक जेव्हा महापालिकेच्या पवित्र सभागृहात जाण्यासाठी सज्ज होतात, तेव्हा शहराच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. सध्या पुण्यातील गुन्ह्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. असे असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे किंवा कुटुंबांकडे सत्ता जाऊन ते गब्बर होण्यामध्ये सामान्य जनतेचे सर्वाधिक नुकसान होते. आता आंदेकर आणि कोमकर या दोन्ही कुटुंबांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या गँगवॉरचे सावट निवडणुकीवर कसे पडते आणि प्रशासन ही परिस्थिती कशी हाताळते, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – BMC Elections Mahayutiv vs MVA : सेना भाजप एकत्र लढण्याची मानसिकता पण…; शिरसाट नेमकं काय म्हणाले?