Monday, February 09, 2026 02:26:10 PM

Pune Accident News: पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा कहर! मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू, चालक फरार

पुण्यातील पाषाण रस्त्यावर एनसीएल इन्स्टिट्यूटसमोर सकाळच्या मॉर्निंग वॉकदरम्यान चारचाकीने दिलेल्या धडकेत 65 वर्षीय आशा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

pune accident news पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा कहर मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू चालक फरार

Pune Accident News: पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळच्या शांत वेळेत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा भरधाव चारचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना पुण्यातील पाषाण रस्त्यावरील एनसीएल (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) इन्स्टिट्यूटसमोर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आशा पाटील असून त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्या परिसरातच वास्तव्यास होत्या आणि रोजप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास आशा पाटील या पाषाण रस्त्यावरून चालत असताना त्यांच्या पाठीमागून वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्या रस्त्यावरच कोसळल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहनचालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून फरार चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात अलीकडच्या काळात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 


सम्बन्धित सामग्री