Thursday, July 17, 2025 03:24:29 AM

Pune Kundmala Bridge Collapse: कुंडमळा दुर्घटनेत 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

pune kundmala bridge collapse कुंडमळा दुर्घटनेत 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

पुणे: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी या ठिकाणी 25 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील जागेवर पोहोचून काही हायड्रा मशीन जागेवर मागवल्या. सर्व पथकांनी एकत्रित येऊन काम चालू केले. स्थानिक नागरीकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या ठिकाणी किमान 250 स्वयंसेवक काम करत होते.

हेही वाचा : Maharashtra Rain Update: राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु

प्रथम जे लोक जिवंत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. तळेगाव येतील ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल येथे जखमींना दाखल करण्यात आले आहे. आज अखेर 35 जखमी रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून, 11 जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या जखमींना तत्काळ आयसीयूमध्ये हलविण्यात आले. आयसीयूमधील रुग्णांची रविवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यासाठी सूचना दिल्या. कुंडमळा येथील घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन माहिती घेतली व सर्व यंत्रणंना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या. रविवारपासून आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणत्याही पर्यटकाची हरवल्याबाबत तक्रार सोमवारी सांयकाळपर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेवटी आज सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबविले असल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री