पुणे महापालिका निवडणुकीच्या रणांगणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या वाहतूक कोंडीवर एक अत्यंत धाडसी आणि 'फ्युचरिस्टिक' तोडगा मांडला आहे. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत, मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी चक्क 'पाताळ लोक' उभारण्याची घोषणा केली. जमिनीवर रस्ते रुंदीकरणाला जागा नाही आणि उड्डाणपुलांमुळे आकाशातही मर्यादा आल्या आहेत, अशा परिस्थितीत आता थेट जमिनीखाली 54 किलोमीटरचे बोगदे (Tunnels) बांधून पुणेकरांचा प्रवास वेगवान करण्याचा मास्टरप्लॅन त्यांनी सादर केला.
पुण्यासाठी 32 हजार कोटींचा 'पाताळ लोक' प्लॅन
पुण्यातील वाढती वाहनसंख्या आणि अपुरे रस्ते यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शहरात सध्या जमिनीवर नऊ टक्क्यांहून कमी रस्ते आहेत, तर वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून 32 हजार कोटी रुपये खर्चून 54 किलोमीटर लांबीचे 'ट्विन टनेल' नेटवर्क उभारण्यात येणार आहे. हे बोगदे येरवडा ते कात्रज, पाषाण ते कोथरूड आणि औंध ते संगमवाडी अशा प्रमुख भागांना जोडतील. या प्रकल्पाचा सविस्तर तांत्रिक आराखडा (Detailed Planning) तयार असून, आधुनिक 'टनेल बोअरिंग मशीन'च्या (TBM) साहाय्याने हे काम अवघ्या अडीच ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
हेही वाचा: Maharashtra Municipal Election: बाळासाहेबांचे स्वप्न माझ्यामुळे पूर्ण होत असेल तर...; गिरीजा ओकच्या त्या प्रश्नावर फडणवीस स्पष्टचं बोलले
23 नवीन उड्डाणपुलांचे जाळे
केवळ जमिनीखालीच नव्हे, तर जमिनीवरही वाहतूक सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 23 नवीन उड्डाणपुलांची घोषणा केली. यापैकी आठ पुलांचे काम आधीच प्रगतीपथावर असून, उर्वरित 15 पुलांचे काम येत्या तीन महिन्यांत सुरू होईल. विशेष म्हणजे, हे पूल पुढील 25 वर्षे तोडावे लागणार नाहीत, अशा प्रगत तंत्रज्ञानाने बांधले जाणार आहेत. "पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे आणि त्या इंजिनाला ट्रॅफिकचा ब्रेक लागू नये, ही आमची प्राथमिकता आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
एकावर एक टनेल: वाहतुकीची नवी 'मल्टी-लेयर' संकल्पना
फडणवीस यांनी यावेळी पुण्यात प्रथमच 'मल्टी-डेकर टनेल' संकल्पना मांडली. ज्यामध्ये खालच्या थरातून मेट्रो धावेल, तर त्याच्या वरच्या थरातून खासगी वाहने धावू शकतील. यामुळे कमी जागेत जास्त वाहतूक क्षमता निर्माण होईल. या बोगद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे पार्किंग किंवा फेरीवाले नसतील, ज्यामुळे वाहनांचा वेग कायम राहील. मुंबईत कोस्टल रोड आणि इतर प्रकल्पांच्या यशस्वी अनुभवानंतर आता पुण्यात हे मॉडेल राबवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
'सिंगल तिकीट' आणि ट्रॅव्हल प्लॅन
पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळवण्यासाठी 'ट्रॅव्हल प्लॅन'ची संकल्पनाही त्यांनी मांडली. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही 'सिंगल तिकीट' प्रणाली लागू करण्यात येईल, ज्यामुळे प्रवाशाला मेट्रो, बस आणि इतर माध्यमांतून प्रवास करण्यासाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची गरज पडणार नाही. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक सिग्नल नियंत्रित करणे आणि महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, हे देखील या व्हिजनचा भाग आहे.
या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात 'पाताळ लोक' या शब्दाची मोठी चर्चा रंगली आहे. विरोधकांनी याला 'निवडणुकीचे गाजर' म्हटले असले, तरी तांत्रिक आराखडा आणि निधीची तरतूद पाहता, पुणेकर या नव्या स्वप्नाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आता 16 जानेवारीच्या निकालानंतर पुण्याच्या विकासाचा हा 'पाताळ मार्ग' कधी प्रत्यक्षात उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: Uddhav Thackeray : "...तर फडणवीसांनी अजित पवारांची जाहीरपणे माफी मागावी" अजित पवारांवर भाजपने केलेल्या 'त्या' आरोपावरून उद्धव ठाकरे कडाडले