पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असताना, पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतःच या कारणावरून चर्चेत आले आहेत. सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी ते येणार असल्यामुळे स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. मंदिरासमोरील चौकही काही वेळासाठी बंद ठेवण्यात आला. एवढा मोठा बंदोबस्त असल्याने मुख्यमंत्री किंवा एखादा केंद्रीय मंत्री येत आहेत असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात हा बंदोबस्त पोलीस आयुक्तांसाठीच असल्याचे दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
पुण्यात वाहतूक कोंडी हा दिवसेंदिवस वाढणारा गंभीर प्रश्न आहे. शाळा, कॉलेज व ऑफिसच्या वेळी लहान अंतरासाठीही दीड तासांपर्यंतचा वेळ लागत असल्याची तक्रार पुणेकर करतात. तरीही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. उलट शहराचे पोलीस आयुक्त स्वतःच्या दौऱ्यासाठी रस्ते बंद करून नागरिकांना अधिक त्रास देत असल्याची टीका सुरू झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पुणेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येकडे दुर्लक्ष करून स्वतःसाठी व्हीआयपी सुविधा मिळवणं ही दुहेरी वागणूक असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाने या बाबत स्पष्ट भूमिका मांडावी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी भूमिका घ्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.