रायगड : राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांची मोट बांधणी सुरू असतानाच काही नेत्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. महायुतीत आपापसात नेतेमंडळी पक्षांतर करत असून पुन्हा एक नेता भाजपमधून एकनाथ शिंदे गटात (शिवसेनेत) प्रवेश केला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातील भाजपते नेते रवी मुंढे यांनी नुकतेच शेकडो कार्यकर्त्यांसह तळा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवी मुंढे यांची ही घरवापसी असून नोव्हेंबर 2020 रोजी त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये पक्षांतर केले होते. विशेष म्हणजे रवी मुंढेंना परत आणण्याचे श्रेय भरत गोगावले यांना जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा निकटवर्तीय आपल्याकडे खेचला होता. त्यानंतर आता भाजपच्या स्थानिक नेत्यालाही आपल्याकडे खेचले आहे.
हेही वाचा : Raj Thackeray EVM Morcha : 'बॉसला मारा पण मोर्चाला या, दिल्लीला महाराष्ट्राचा राग दाखवण्याची हीच ती वेळ' : राज ठाकरे
रवी मुंढे यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर अवधूत तटकरे यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. या लढतीत त्यांचा केवळ 77 मतांनी पराभव झाला होता. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे असल्याने त्यावेळी या लढतीने रायगड जिल्ह्यात मोठं राजकीय लक्ष वेधलं होतं. पुढे शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख राहिलेल्या रवी मुंढे यांनी 2020 रोजी शिवसेनेला रामराम केला. त्यावेळी तळा नगरपंचायतची शिवसेनेचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्यात जोरदार वाद सुरु होते. दोघांकडूनही एकमेकांवर छुपे वार केले जात होते. या वादाला मुंढे यांनीच तोंड फोडले. त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांवर टक्केवारीसाठी ठेकेदाराला पळवून लावत असल्याचा आरोप केला. रवी मुंढे यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी पत्रकार परिषद घेत त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर तसेच पदाधिकार्यांवर आगपाखड केली होती. काही दिवसांनंतर म्हणजेच जानेवारी 2021 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.