निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग असलेल्या आणि सत्तेची सूत्रे आपल्याच हाती ठेवणाऱ्या भाजपमध्ये सगळं काही आलबेलं सुरू नसल्याची चर्चा सुरू असते. अनेक ठिकाणी पक्षात संघर्ष सुरू असल्याची चर्चा रंगत असताना कर्जतच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे कर्जत शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी भाजपला रामराम ठोकत खासदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत शहर भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर कर्जतच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून कर्जत भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावेळी पक्षातील तीव्र गटबाजी आणि वरिष्ठ नेत्यांचे याकडे असलेले दुर्लक्ष याला कंटाळूनच लाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
त्यानंतर राजेश लाड यांनी अखेर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात घरवापसी केल्यामुळे कर्जतमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तटकरे आणि लाड कुटुंबीयांतील जुने राजकीय संबंध लक्षात घेता हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी आगामी काळात फायदेशीर ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असून माजी आमदार सुरेश लाड यांच्या गटालाही या घडामोडीचा फटका बसू शकतो, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.