Mumbai Rain Alert: मुंबई आणि आसपासच्या परिसरासह संपूर्ण राज्याला मान्सूनच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला अत्यंत सावध राहण्याचे आणि प्रशासकीय सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पुढील 2 दिवस सरासरीपेक्षा कित्येक पटीने जास्त पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF आणि SDRF च्या तुकड्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
दर तीन तासांनी SMS अलर्ट; जून 6 पर्यंत कोकण-पुण्यात पावसाचे थैमान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, तसेच नाशिक आणि पुण्याच्या घाट माथ्यावर 6 जून पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन दर 3 तासांनी मोबाईलवर हवामानाचे ताजे अपडेट्स (SMS) पाठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. वसई, विरार आणि नालासोपारा भागात कंबरेएवढे पाणी साचले असून, दुपारी 2:00 च्या सुमारास समुद्राला आलेल्या भरतीमुळे सखल भागात पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी BMC चा मोठा निर्णय
दरम्यान, शनिवारी मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने पावले उचलली आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जे विद्यार्थी सकाळच्या सत्रासाठी आधीच शाळेत पोहोचले होते, त्यांना शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या कडक सूचना शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दिल्या आहेत.