Wednesday, February 18, 2026 05:56:12 PM

BMC Election 2026: 'लाव रे तो व्हिडिओ'ला भाजपचं 'काढ रे तो फोटो'ने उत्तर; अमित साटम राज ठाकरेंना म्हणाले ढोंगी आणि ...

राज ठाकरेंच्या या 'अदानी' अस्त्रानंतर भाजपनेही संयम न राखता थेट हल्ला चढवला आहे.

bmc election 2026 लाव रे तो व्हिडिओला भाजपचं काढ रे तो फोटोने उत्तर अमित साटम राज ठाकरेंना म्हणाले ढोंगी आणि

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत राजकीय मैदानात धुरळा उडवून दिला आहे. शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी अदानी समूहाच्या अफाट विस्ताराचा पाढाच वाचला. 2014 पूर्वी देशाच्या नकाशावर मर्यादित असलेल्या अदानींचे साम्राज्य भाजपच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कसे पसरले, याचे एक विशेष प्रेझेंटेशन त्यांनी मांडले. मुंबईचे विमानतळ असो, धारावीचा पुनर्विकास असो किंवा सिमेंट उद्योग, सर्वत्र एकाच उद्योगपतीचा वरचष्मा कसा, असा सवाल करत राज यांनी थेट केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर तोफ डागली.

राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली असून, विशेषतः भाजपच्या गोटातून याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज यांनी मांडलेल्या पुराव्यांनुसार, अदानी समूह अल्पावधीतच देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक बनला असून सरकारी प्रकल्पांमध्ये त्यांच्याच साहित्याचा वापर होत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. "मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीला असे मोठे करणे धोक्याचे आहे," असे म्हणत राज यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले.

हेही वाचा: भूमिकेसाठी अभिनेत्रीने घेतली वकील उज्ज्वल निकमांची भेट, अनुभवही केला शेअर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाली?

भाजपचा पलटवार

राज ठाकरेंच्या या 'अदानी' अस्त्रानंतर भाजपनेही संयम न राखता थेट हल्ला चढवला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही काळापूर्वी खुद्द गौतम अदानी यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो शेअर करत साटम यांनी राज यांच्या भूमिकेला 'ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस' असे संबोधले आहे. "जेव्हा अदानी घरी येतात तेव्हा चालेल, पण आता जाहीर सभेत विरोध का?" असा बोचरा सवाल या पोस्टद्वारे भाजपने उपस्थित केला आहे.

विमानतळ आणि जमिनींचा वाद

राज ठाकरेंनी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले की, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ आधीच अदानींच्या ताब्यात गेले आहेत आणि आता वाढवण येथील प्रस्तावित प्रकल्पही त्यांच्याच घशात घालण्याचा डाव आहे. धारावीतील मोक्याच्या जमिनी अदानींच्या स्वाधीन करण्याच्या निर्णयावरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली. एका बाजूला मुंबईच्या अस्मितेचा आणि जमिनींचा प्रश्न राज ठाकरेंनी मांडला, तर दुसऱ्या बाजूला भाजपने राज यांच्याच जुन्या भेटींचे पुरावे देऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

या वादानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंची ही बदललेली भूमिका आगामी निवडणुकीत महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपच्या मते, राज ठाकरे हे केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपली भूमिका बदलत आहेत, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी "भेट होणे आणि धोरणांना विरोध करणे यात फरक असतो," असे सांगून राज ठाकरेंची पाठराखण केली आहे.

एकूणच, शिवतीर्थावरचा व्हिडिओ आणि अमित साटम यांनी शेअर केलेला फोटो यामुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात 'हाय व्होल्टेज' ड्रामा सुरू झाला आहे. आता अदानींच्या या मुद्द्यावरून राज ठाकरे पुढची चाल काय रचणार आणि भाजप याला कसे तोंड देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: PMO New Office: पंतप्रधानांचा पत्ता बदलणार, अत्याधुनिक सुविधा आणि...; जाणून घ्या नव्या कार्यालयाची माहिती


सम्बन्धित सामग्री