Sambhajiraje Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला असलेल्या दुर्गराज रायगडावर नुकतेच एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्व असलेले खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यात ‘यंत्रराज’ हे उपकरण सापडले असून, याची माहिती छत्रपती संभाजीराजेंनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे जनतेला दिली.
‘यंत्रराज’ किंवा ‘सौम्ययंत्र’ (Astrolabe) हे प्राचीन खगोलशास्त्रज्ञ वापरत असत. ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणे, दिशा ठरवणे, अक्षांश-रेखांश समजणे आणि वेळ मोजणे यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरत असे. या उपकरणावर कोरलेली अक्षरे, तसेच कासव वा साप सदृश्य प्राण्यांची चित्रे यामुळे उत्तर व दक्षिण दिशांचा अंदाज लावणे शक्य होते. या यंत्रावर कोरलेली ‘मुख’ व ‘पूंछ’ ही अक्षरे त्याच्या दिशादर्शक उपयोगासाठी महत्त्वाची आहेत.
रायगडावर हे यंत्र मिळाल्याने शिवकालीन दुर्गनिर्मितीमध्ये विज्ञान आणि खगोलशास्त्राचा वापर झाला होता, याचा ठोस पुरावा मिळाला आहे. रायगडाचा बारीक अभ्यास करून योग्य दिशानिर्देश आणि नैसर्गिक रचनेचा विचार करूनच त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या यंत्राच्या आधारे त्यावेळचा शास्त्राधिष्ठित दृष्टिकोन आणि तांत्रिक कौशल्य स्पष्टपणे जाणवते.
हे प्राचीन ‘यंत्रराज’ कुशावर्त तलावाजवळ, पर्जन्यमापक व वाडेश्वर मंदिराच्या मध्ये असलेल्या एका ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर उत्खनन करताना सापडले. यामुळे अभ्यासकांना शिवकालीन जीवनशैली, विज्ञान, तसेच त्यावेळचा धोरणात्मक दृष्टिकोन समजून घेण्याची नव्याने संधी प्राप्त झाली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितल्याप्रमाणे, रायगड हा केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. यंत्रराजाच्या शोधामुळे रायगडाच्या गौरवशाली इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. हे उपकरण अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा असून, भविष्यातील संशोधनासाठी नवे दालन खुले करणारे ठरू शकते.