Mumbai-Pune Missing Link Project: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर आता अधिक वेगाने पार करता येणार आहे. एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडी फोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link Project) प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, नव्या वर्षात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या 1 मे 2026 रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
घाटातील कोंडीतून मिळणार सुटका
सध्या लोणावळा आणि खोपोली दरम्यानच्या घाट भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तीव्र उतार आणि वळणांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, परिणामी प्रवाशांचे तास-दीड तास वाया जातात. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून 'मिसिंग लिंक' प्रकल्प राबवण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल.
मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे 'डेडलाईन'
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) या प्रकल्पाचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या प्रकल्पातील मुख्य आकर्षण असलेला अत्याधुनिक 'केबल-स्टेड' पूल आता अंतिम टप्प्यात आहे. पुलाचे दोन्ही भाग जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्च-एप्रिलमध्ये सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या जातील.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि फायदा
या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. यामुळे घाटातील अडथळे दूर झाल्याने इंधनाचीही मोठी बचत होईल. जगातील काही मोजक्या मोठ्या बोगद्यांपैकी एक आणि भव्य केबल पूल या मार्गावर असणार आहे. या प्रकल्पामुळे दळणवळण सोपे झाल्याने पुणे आणि परिसरातील औद्योगिक विकासाला नवी चालना मिळेल.