जळगाव: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या प्रकरणात चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी आपल्या स्वीय सहायकाच्या पत्नीला धमकी दिली. मात्र, यासंदर्भात रोहिणी खडसे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, 'माझ्याकडून कोणीही धमकी दिलेली नाही. जर काही तक्रार होती, तर चाकणकर यांनी मला अधिकृत नोटीस पाठवायला हवी होती. माझ्या स्वीय सहाय्यक नाफडे यांच्या पती-पत्नीमधील कौटुंबिक वादात माझा काही संबंध नाही.'
खडसे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर भाष्य करत सांगितले की, 'महिला आयोगाने त्या वेळी तात्काळ दखल घेतली असती, तर आज वैष्णवी हगवणे जिवंत राहिली असती. त्यामुळे या प्रकरणात आयोगाची जबाबदारी निश्चितच आहे.'
त्याचबरोबर त्यांनी चाकणकर यांच्यावर आरोप केला की त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कार्यक्षमतेने काम करत नाहीत. 'रुपाली चाकणकर पार्ट टाइम पदाधिकारीसारखे काम करत आहेत. त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाहीये. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या पदावरून हटवले जावे,' असे मत खडसे यांनी मांडले.
राजकीय चर्चांबाबत खडसे यांनी स्पष्टीकरण दिले की, 'आपण अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू असल्या, तरी त्यात तथ्य नाही. आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत. त्यांच्या निर्णयानुसारच आमची भूमिका असेल.'
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना रोहिणी खडसे यांनी हे आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, 'पोलिसांनी या प्रकरणात किरकोळ कलमे लावल्या आहेत, त्यामुळे आरोपी निघून जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही अधिक गंभीर कलमे लावण्याची मागणी करत आहोत. तसेच, या प्रकरणात बार कौन्सिलने आरोपीचं वकील पत्र घेऊ नये, अशीही आमची विनंती आहे.'
या घटनेत जर एखादा पोलीस अधिकारी हगवणे कुटुंबीयांना धमकावत असेल, तर त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही रोहिणी खडसेंची मागणी आहे.
'राज्यातील महिलांना हुंडाबळीपासून वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या लढ्यात आम्ही महिलांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहोत,' असे खडसे यांनी स्पष्ट केले.