पालघर :दहीहंडीच्या दिवशी पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला अटक करण्यात आली आहे. रोहित गावित यांना मिरा रोड येथील जीसीसी क्लबमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गावितांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रोहित यांच्यासह शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दहीहंडीच्या दिवशी पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणाची उच्च न्यायालयानं देखील याची दखल घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मारहाण प्रकरणातील कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.
परंतू फरार आरोपी आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना आज, शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. मिरा रोड येथील जीसीसी क्लबमधून रोहित गावित यांना अटक केल्याची माहिती समोर आहे. पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, आमदार पुत्र रोहित गावित यांच्यासह 14 आरोपींचा पालघर पोलिसांकडून शोध सुरू होता. अखेर रोहित गावित यांना मिरा रोड येथून पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.