लातूर: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे बडूर या गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता एका कुटुंबासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. या घटनेमध्ये शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या कुटुंबाला आधार देत, त्यांच्या द्वितीय कन्या अपूर्वा हिचे पालकत्व स्वीकारले आहे.
गुरुलिंग हासुरे हे औंढा गावाजवळील शेतात काम करत असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. ते घरातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या आजी, आई, पत्नी, आणि तीन मुली असा परिवार आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी जोरदार आंदोलन व उपोषण केले. या उपोषणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार रोहित पवार यांना दिली. त्यानंतर रोहित पवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत, या कुटुंबातील एका मुलीचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला.
यानुसार, गुरुलिंग हासुरे यांची दुसरी कन्या अपूर्वा हिचे पालकत्व रोहित पवार यांनी औपचारिकरित्या स्वीकारले. यानंतर त्यांनी तिला बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन या शाळेत इयत्ता पाचवीत मोफत प्रवेश मिळवून दिला. अपूर्वाचे संपूर्ण शिक्षण खर्च तसेच पुढील काळातील आवश्यक जबाबदाऱ्या स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
हेही वाचा: गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी प्रस्तावाला गती; मंत्री नितेश राणे यांचे बंदरे विभागाला नियोजनाचे आदेश
या प्रसंगी गुरुलिंग हासुरे यांच्या पत्नी संगीता हासुरे, काका गुंडाप्पा हासुरे, आणि सिद्धू हासुरे यांनी आमदार रोहित पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या पुढाकारातून ही मदत शक्य झाली.
ही घटना केवळ सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण नाही, तर राजकीय व्यक्तींनी लोकांसाठी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतल्याचे आदर्श उदाहरण ठरते. अपूर्वाच्या शिक्षणाचा प्रश्न मिटल्यामुळे कुटुंबाला थोडासा दिलासा मिळाला असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता नव्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
